पुणे : नांदेड सिटी परिसरातून एक शाळकरी मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेतील अधिकारी रस्त्यावर उतरले. बेपत्ता झालेली मुलगी गुरुवारी सायंकाळी रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात सापडली. मुलगी सुखरूप असून, तिला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नांदेड सिटी परिसरात राहणारी मुलगी शाळेत गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती. तिच्या कुटुंबीयांनी पोलिसाकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी समाज माध्यमातून मुलगी बेपत्ता झाल्याचा संदेश प्रसारित केला होता. मुलीची माहिती कळविण्याचे आवाहन केले होते. मुलगी रांजणगाव परिसरात असल्याची माहिती एका सजग नागरिकाने कळवली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन तिला ताब्यात घेतले.
हेही वाचा – बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुलीची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेच्या पथकांना मुलीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. मुलगी गुरुवारी संध्याकाळी सापडल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार रांजणगावला गेले. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे आणि गुन्हे शाखेतील अधिकारी यावेळी उपस्थित होते.