पुणे: शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर शिकवणी चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने शाळकरी मुलगी आणि तिच्या लहान भावाला जीवे मारण्याची धमकी दिली असून, याप्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अलोक सर (रा. घोरपडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १४ वर्षीय शाळकरी मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलीची शिकवणी घेण्यासाठी आरोपी अलोक तिच्या घरी यायचा. मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकाराची वाच्यता केल्यास शाळकरी मुलगी आणि तिच्या लहान भावाला आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली.
हेही वाचा… पिंपरी : इंद्रायणी नदीत दोन जण बुडाले, गेल्या ४८ तासांपासून शोध मोहीम सुरूच…
दरम्यान, मुलगी गर्भवती राहिली. तिच्या आईच्या निदर्शनास हा प्रकार आला. मुलीने घरी शिकवणीसाठी येणारे अलोक सरांनी बलात्कार केल्याचे आईला सांगितले. त्यानंतर मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करत आहेत.