पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याच्या उपाययोजनांची स्थिती, पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा वापर, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे, आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी, शाळांची वेळ अशा विविध योजना, उपक्रमांची माहिती विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानअंतर्गत घेतली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून हे महाअभियान १ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राबवले जाणार असून, त्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना शाळांना भेट द्यावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी या बाबतची माहिती दिली. विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानाअंतर्गत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांबाबत प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – सेट परीक्षेच्या निकालाचा मार्ग मोकळा… एसईबीसी आरक्षण होणार लागू

हेही वाचा – पिंपरी : घरफोडीच्या पैशांतून मध्य प्रदेशातून खरेदी केल्या पिस्तुल; घरातच झाडल्या गोळ्या

अभियानातील पहिल्या वीस दिवसांत प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे, त्यानंतर चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे, अशा पद्धतीने या अभियानाची कार्यदिशा निश्चित करण्यात आली आहे.
अभियानाअंतर्गत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी शाळांना भेट द्यावी लागणार आहे. सरल संकेतस्थळाद्वारे केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी, प्राचार्य, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळा भेटीनंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्याबाबतचा अहवाल दररोज लॉगिनद्वारे अद्ययावत करायचा आहे. शिक्षण उपसंचालकांनी जास्तीत जास्त शाळा तपासण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट निश्चित करून द्यावे, माहिती अचूक संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत शाळांच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहेत का, याची खात्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School inspection education department officials will inspect the schools what will happen between 1st and 31st august pune print news ccp 14 ssb