विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य शासनाने स्कूल बस नियमावली तयार केली. सुरुवातीला त्यात रिक्षांतून विद्यार्थी वाहतुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. पुण्यासारख्या शहरांत शालेय विद्यार्थी वाहतुकीत रिक्षांचे स्थान लक्षात घेता स्कूल बस नियमावलीत अखेर रिक्षांचाही समावेश झाला. मात्र, या नियमावलीनुसार रिक्षांतून विद्यार्थ्यांची वाहतूक करायची असल्यास रिक्षाचे हूड, आसने, दरवाजे आदी बाबतीत रिक्षा भक्कम करण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. पण, अजूनही शालेय वाहतुकीतील ही रिक्षा ‘भक्कम’ झालेली नाही.
शालेय विद्यार्थी वाहतुकीत असलेल्या बसगाडय़ांना झालेले अपघात लक्षात घेऊन राज्य शासनाने शालेय बसबाबत नवी नियमावली तयार केली. या नियमावलीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थी वाहतुकीतील बसबाबत अत्यंत काटेकोर नियम आहेत. पुण्यासारख्या शहरामध्ये काही भागांतील अरुंद रस्ते लक्षात घेता या ठिकाणी रिक्षातूनच वाहतूक करता येते. अशा परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षातून केली जाते. मात्र, नवी नियमावली तयार करताना रिक्षा हे विद्यार्थी वाहतुकीसाठी योग्य वाहन नसल्याचे गृहीत धरून रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीतून वगळण्यात आले होते. त्यामुळे स्कूल बस नियमावली व रिक्षाचा कोणताही संबंध ठेवण्यात आला नव्हता.
शहरात सध्या सुमारे पंधरा हजार रिक्षा शालेय विद्यार्थी वाहतुकीत आहेत. त्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत शासनाचे धोरण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे रिक्षाचा समावेश स्कूल बस नियमावलीत करण्याचे धोरण शासनाने ठरविले होते. मूळ स्कूल बस नियमावलीमध्ये काही बदल करावेत, अशी मागणी स्कूल बस चालक-मालकांच्या संघटनांनी केली होती. त्यानुसार स्कूल बस नियमावलीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड न करता काही तांत्रिक बदल करण्यात आले. हा नवा मसुदा तयार करताना शासनाने रिक्षाचाही शालेय विद्यार्थी वाहतुकीत मुभा देण्याचा निर्णय घेतला.
रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीला मुभा दिली असली, तरी त्यासाठी रिक्षात सुरक्षिततेच्या दृष्टीने काही बदल करण्याचे बंधन घातले आहे. मात्र, त्यामुळे विद्यार्थी वाहतुकीतील रिक्षांमध्ये असे कोणतेही बदल अद्याप करण्यात आलेले नाहीत. जुन्या पद्धतीनेच सध्याही विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येते. नव्याने सुरू होणाऱ्या शालेय वर्षांपासून तरी शालेय वाहतुकीतील रिक्षांबाबतच्या नियमावलीची अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अशी असावी विद्यार्थी वाहतुकीची रिक्षा
नियमानुसार रिक्षाला विद्यार्थी वाहतुकीत मुभा देत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रिक्षात काही बदल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रिक्षाचे सध्याचे हूड अधिक टणक, मजबूत करावे लागणार आहे. कॅनव्हासच्या हूड असलेल्या रिक्षांना विद्यार्थी वाहतूक करता येणार नाही. त्याचप्रमाणे मागील आसनांजवळील रिक्षाची एक बाजू ग्रीलने पूर्णपणे बंद करून दुसऱ्या बाजूला ग्रीलचा दरवाजा असावा. त्याचप्रमाणे अग्निशमन यंत्रणेचाही रिक्षात समावेश असणे आवश्यक आहे.

Story img Loader