पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षणाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांची माहिती आता विद्यार्थ्यांना शाळेतच दिली जाणार आहे. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या स्कूल कनेक्ट या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ ते १५ जानेवारी या कालावधीत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल कनेक्ट २.०’ हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्याबाबत जागृती करण्यासाठी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्कूल कनेक्ट’ अभियान अकृषी विद्यापीठांच्या स्तरावर राबवण्यात आले. यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवून तो नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा : लोकशाहीच्या समृद्धीसाठी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व गरजेचे ; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन

विद्यापीठांच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या स्कूल कनेक्ट २.० या उपक्रमात व्याख्याने, प्रशिक्षण शिबिरांसह ऑनलाइन पद्धतीने राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षणातील बदलांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करावे, विद्यार्थ्यांना महाविद्यालये, विद्यापीठ संकुलाची भेट घडवावी, उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाच्या स्तरावर प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड

‘स्कूल कनेक्ट २.०’मध्ये होणार काय?

  • विद्यार्थ्यांना बारावीनंतर आवडीचा अभ्यासक्रम निवडण्यासाठी मार्गदर्शन
  • दहावीनंतरचे रोजगारक्षम अभ्यासक्रम, उपलब्ध संधी, पदवी अभ्यासक्रमाच्या संधींची माहिती
  • प्रत्येक विद्यार्थी उच्च शिक्षणाकडे जाण्यासाठी मार्गदर्शन
  • विद्यापीठांच्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती
  • नव्या पद्धतीचे मूल्यांकन, श्रेयांक पद्धतीबाबत मार्गदर्शन
  • शिष्यवृत्तीबाबत माहिती
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School students now given guidance about changes in higher education under school connect 2 0 pune print news ccp 14 css