विद्यार्थिदशेतील मौजमजा, वर्गातील मस्ती, वर्गमित्रांबरोबर झालेले वाद, मारामारी या साऱ्या गोष्टी अविस्मरणीय आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात शालेय जीवन हा महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शाळेतील वादांचे पर्यवसान गंभीर गुन्ह्यांमध्ये झाल्याचे दिसून आले आहे. वादावादीतून शाळकरी मुलांनी शाळेच्या आवारातच थेट शस्त्रे उगारल्याच्या घटना घडल्याने उमलत्या वयातील हिंसा ही चिंतेचा विषय ठरली आहे.

नोव्हेंबर-डिसेंबर महिना सुरू होताच विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. स्नेहसंमेलनाची तयारी सुरू होते. हडपसर भागातील एका शाळेत वार्षिक स्नेहसमारंभातील कार्यक्रमावरून नववीतील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर भर वर्गात एकाने वर्गात बसलेल्या विद्यार्थ्याचा गळा काचेच्या तुकड्याने चिरला. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला. भर वर्गात विद्यार्थ्याचा गळा चिरल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शाळेतील शिक्षकही सुन्न झाले. अशाच पद्धतीची घटना वर्षभरापूर्वी भवानी पेठेतील एका शाळेच्या परिसरात घडली. शाळेतील वादातून एका विद्यार्थ्याला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. विद्यार्थ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. अप्पा बळवंत चौक परिसरात एका शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. विद्यार्थ्यांमध्ये होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमुळे शिक्षक, मुख्याध्यापकही चिंतेत आहेत. मुले थेट कोयता घेऊन वर्गात येतात. दप्तरात लपवून कोयता आणतात, अशा तक्रारी शाळा प्रशासनाकडे करण्यात आल्या.

हेही वाचा – कोथरुडमध्ये मित्राचा खून करणाऱ्या तरुणाला जन्मठेप

एखाद्या सराइताप्रमाणे विद्यार्थी आक्रमक होऊन वर्गमित्रांवर हल्ला करण्याच्या घटना गेल्या दोन ते तीन वर्षांत घडल्याने शाळेच्या आवारातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थिदशेतील मुलांना गुन्हेगारी कृत्यांपासून रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अल्पवयीनांमधील गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांकडून शाळा, महाविद्यालयात समुपदेशन वर्ग आयोजित करण्यात आले. गुन्हेगारीचे आकर्षण असलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. पालकांना बोलावून त्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. समाजमाध्यमात अनेक सराईत गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रफिती प्रसारित करतात. वस्तीभागात राहणारी मुले ही गुन्हेगारी टोळ्यांकडे आकर्षित होतात. गुन्हेगारी टोळ्या मुलांचा वापर करतात. दहशत माजविणे, वाहन तोडफोडीच्या घटना, तसेच गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन सामील होतात. अल्पवयीन असल्याने त्यांच्यावरील कारवाईस मर्यादा येतात. त्यामुळे अल्पवयीनांमधील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

अनेक मुले शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असतात. गुन्हेगारीच्या आकर्षणापोटी मुले भरकटतात. यात दोष कोणाचा, हा प्रश्नदेखील उपस्थित होतो. मुळात कोणतेही पालक मुलांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करत नाहीत. भवतालची परिस्थिती, समाजमाध्यमातील चित्रफिती, आकर्षण, समाजात प्रभाव पाडण्यासाठी मुले गैरमार्गाला लागतात. काही मुले संवेदनशील असतात. त्यांचा कल गुन्हेगारीकडे नसतो. अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलांकडून पालकांच्या अपेक्षा असतात. दहावी- बारावीतील मुले दडपण घेतात. पालकांच्या अपेक्षा आणि अतिताणामुळे मुले आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. पंधरा दिवसांपूर्वी हडपसर भागात दहावीतील एका मुलीने पूर्वपरीक्षेपूर्वी राहत्या घरात गळपास घेऊन आतम्हत्या केली. या साऱ्या घटना सुन्न करणाऱ्या आहेत.

हेही वाचा – निवडणूक कामाच्या मानधनात तफावत?

मानसशास्त्रज्ञांचे निरीक्षण काय?

पूर्वी मुले एकत्र कुटुंबात राहायची. एकत्र कुटुंबात एखादी गोष्ट किंवा वस्तू नाही मिळाली, तरी मुले फारशी त्रागा करायची नाहीत. आता परिस्थिती बदलली आहे. मागणी केल्यानंतर मुलांना हव्या त्या वस्तू मिळतात. त्यामुळे मुलांच्या वर्तनात फरक पडतो. मुलांना नकार पचवता येत नाही. समाजमाध्यम, तसेच चित्रपटातील हिंसक दृश्यांचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. मुले आक्रमक होतात. स्पर्धेच्या युगात अपयश आले, की मुले निराश होतात. नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते, असे निरीक्षण मानसशास्त्रज्ञ डाॅ. सुजला वाटवे यांनी नोंदविले.

rahul.khaladkar@expressindia.com