मुलावर वार केल्यानंतर कोयते मिरवित परिसरात दहशत ;वडगाव बुद्रुकमधील घटनेत तीन अल्पवयीन मुले ताब्यात
इन्स्टाग्रामवर सातत्याने स्टेट्स ठेवत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका शाळकरी मुलावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली आहे. केवळ वार करून न थांबता हातातील कोयते मिरवून त्यांनी परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयचत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याबाबत एका १६ वर्षीय मुलाने तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी १७ वर्षीय तीन अल्पवयीन मुलांना पकडले असून, त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा आंबेगाव दाभाडीत इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. तो इन्स्टाग्रामवर दररोज दोन ते तीन छायाचित्र टाकतो. स्वतःसह इतरांची छायाचित्रे दररोज इन्स्टाग्रामवर टाकत असल्याबाबत त्याच्याच परिसरात राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलांच्या मनात राग होता.
संबंधित मुलगा २९ मे रोजी बुद्रुकमधील घुलेनगर परिसरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी चार ते पाच जणांच्या अल्पवयीन मुलांच्या टोळीने त्याला गाठले आणि इन्स्टाग्रामवर छायाचित्र अपलोड करण्याचा जाब विचारला. त्यातून वाद झाल्यानंतर या मुलांनी त्याच्यावर थेट कोयत्याने वार केले. दोन्ही हातासह, डोक्यावर वार करून त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. हल्ला करून न थांबता या अल्पवयीन मुलांनी हातात कोयते मिरवत दहशतही माजविली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जखमी मुलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून तिघांना ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा