पुणे : अतिवृष्टीमुळे गुरुवारी शाळांना सुटी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरातील शाळा शुक्रवारी सुरू होतील. तर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने १६ जुलैपर्यंत सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यांतील शाळांना सुटी, तर पुण्यातील शाळा सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले. 

गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील सर्व माध्यमांच्या शाळांना गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली. तर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर आणि पुरंदर हे पाच तालुके वगळून उर्वरित तालुक्यांतील शाळांना १४ ते १६ जुलै या कालावधीत सुटी जाहीर केली.

या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या हद्दीतील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना शनिवारपर्यंत (१६ जुलै) सुटी जाहीर केली. तर पुणे महापालिकेने १५ जुलैपासन महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा नियमितपणे सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.