विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याची न्यायालयाने तंबी दिली की तिथून शिक्षण विभाग, शिक्षणाधिकारी असा प्रवास करत दप्तराचे वजन कमी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांच्या खांद्यावर येऊन पडते. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन कमी करण्यासाठी अनेक शाळांकडून आवर्जुन पुढाकार घेऊन उपक्रम चालवले जात असताना काही शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या अजब सूचनांनी पालकही गोंधळून गेले आहेत. आधीच्या सत्रातील अभ्यासक्रमाचा भाग पुस्तकातून फाडून टाका, दप्तरच बदला, कापडी पिशवीच आणा, पिण्याचे पाणी आणू नका अशा सूचना काही शाळांकडून देण्यात येत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासनाने जुलै महिन्यांत निर्णय जाहीर केला. मात्र तरीही दप्तराचे वजन कायम राहिले. गेल्या महिन्यांत पुण्यात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत ५६ टक्के विद्यार्थ्यांचे दप्तर वजनदारच असल्याचे समोर आले. त्यावर न्यायालयाने खडसावल्यानंतर शिक्षण विभागाने ही जबाबदारी मुख्याध्यापकांवर ढकलली. शाळेने त्यांच्या पातळीवर काही उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची दप्तरे हलकी होतील यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते. मात्र काही शाळांकडून सध्या करण्यात येणाऱ्या उपायांनी पालकही गोंधळून गेले आहेत. एका शाळेने पुस्तकातील गेल्या सत्राच्या अभ्यासक्रमाचा भाग फाडून टाकण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. त्यामुळे दप्तराचे वजन कमी होणार असले, तरी विद्यार्थ्यांना आधीचे संदर्भ मिळू शकणार नाहीत. पुढील वर्षांसाठीही ही फाडलेली पुस्तके उपयोगी ठरणार नाहीत.
काही शाळांनी विद्यार्थ्यांचे दप्तर पूर्णपणे रिकामे करून त्याचे वजन केले. हे वजन जास्त भरल्यामुळे दप्तरच बदलून टाकण्याच्या सूचनाही शाळांकडून देण्यात येत आहेत. कापडी पिशवी किंवा दप्तर वापरण्यात यावे अशी सूचनाही काही शाळांनी दिली आहे. दप्तराच्या वजनातील एक महत्त्वाचा भाग असतो, तो पिण्याच्या पाण्याची बाटली. विद्यार्थ्यांना शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बाटली विद्यार्थ्यांच्या दप्तरात ठेवू नये किंवा स्वतंत्र डबा, बाटली यांची स्वतंत्र पिशवी द्यावी अशी सूचना एका शाळेने केली असल्याची माहिती पालकांनी दिली.
याबाबत पालक अंजली वाघ यांनी सांगितले, ‘माझ्या मुलाच्या शाळेत डबा, बाटली स्वतंत्रपणे देण्यात यावी अशी सूचना देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांने उचलायचे वजन कमी होणार नाही तर ते फक्त विभागले जाईल.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा