पुणे : उन्हाळय़ाच्या सुटीत आंब्यांचा आस्वाद, ठिकठिकाणी सहकुटुंब भटकंती झाल्यानंतर विदर्भ वगळता राज्यातील शाळांमध्ये आजपासून (१५ जून) पुन्हा किलबिलाट होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी  जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र पहिल्याच दिवशी शाळांकडून विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 उन्हाच्या तीव्रतेमुळे २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष हे एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच संपले. त्यामुळे जवळपास पावणे दोन महिन्याच्या सुटीनंतर आजपासून पुन्हा शाळा सुरू आहेत. पूर्वप्राथमिकमधून पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी, शाळेविषयी आपुलकी वाटण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

दरम्यान शालेय गणवेशाच्या मुद्दय़ावरून वाद निर्माण झाला होता. मात्र शिक्षण विभागाने दोन्ही गणवेशांची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवून  पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयाला विलंब झाल्यामुळे पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याबाबत प्रश्नचिन्हच आहे.

वह्यांची पाने समाविष्ट  असलेली एकात्मिक पाठय़पुस्तके

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार यंदा बालभारतीने पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पद्धतीची पाठय़पुस्तके तयार केली आहेत. चार भागांमध्ये असलेल्या पाठय़पुस्तकात वह्यांची पाने समाविष्ट करण्यात आली आहेत. या पानांवर विद्यार्थ्यांना शिक्षणपूरक नोंदी करता येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि ऊर्दू माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत ही पाठय़पुस्तके लागू करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळण्यासाठी शिक्षण विभागाकडून राज्यभरात पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Schools open in the state except vidarbha from today ysh