राज्यभरातील शाळांमध्ये रविवारी, २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्याचे आदेश केंद्रीय शिक्षण मंडळ आणि शालेय शिक्षण विभागाने दिल्यामुळे आता काही शाळांना पालकांकडून पैसे उकळण्याचे निमित्तच मिळाले आहे. पुण्यातील काही नामांकित शाळांनी योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांकडूनच निधी उभा करण्याचा घाट घातला आहे. एका शाळेने विद्यार्थ्यांना ‘योग दिना’चे टी-शर्ट्स घेणेही बंधनकारक केले आहे.
केंद्रीय शिक्षण मंडळाने आणि राज्याच्या शिक्षण विभागानेही ‘योग दिन’ साजरा करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत. ‘योग दिन’ साजरा करणे बंधनकारक नसल्याचे सांगत दुसरीकडे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे सहाजिकच शाळा आता ‘योग दिन’ साजरा करण्यासाठी सरसावल्या आहेत. काही शाळांनी मात्र त्यातही आपले उखळ पांढरे करण्याचा घाट घातला आहे. रविवारी योग दिन साजरा करायचा म्हणून सुरुवातील कुरकुर करणाऱ्या या शाळांनी योगाचे ‘लाभ’ ओळखून आता मोठय़ा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रामुख्याने केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या या शाळा आहेत.
पुण्यातील काही नामांकित शाळा सध्या योग दिन साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने पैसे गोळा करत असल्याची तक्रार काही पालकांनी केली आहे. मुळातच भरमसाट शुल्क आकारणाऱ्या या शाळांना योग दिनाचे पैसे गोळा करण्याचे एक नवे निमित्तच दिले आहे.
पुण्याच्या जवळील एका गावातील एका शाळेने विद्यार्थ्यांना ‘योग दिना’ चे टी-शर्ट्स घेणे बंधनकारक केले आहे. साधारण १५० रुपये किंमत असलेले हे टी-शर्ट्स घालून विद्यार्थ्यांनी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. शाळेकडे पैसे जमा केल्यावर शाळा विद्यार्थ्यांना हे टी-शर्ट्स देणार आहे. दुसऱ्या एका शाळेने कार्यक्रमाचे शुल्क म्हणून १०० रुपये आकारले आहेत.
शहरातील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. मात्र, शाळा सुरू झाल्यावर लगेचच योग दिन साजरा होणार असल्यामुळे पालकांना लघुसंदेश, संगणावरून संदेशाद्वारे तसेच बैठका घेऊन याबाबत माहिती देण्यात येत आहे. वर्षांला लाखो रुपयांचे शुल्क भरूनही आता अशा साजऱ्या होणाऱ्या उपक्रमांचाही भरुदड सोसावा लागणार का, अशी धास्ती पालकांना वाटू लागली आहे.