पुणे : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी २चे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केले आहे. त्यानुसार ८ ते २५ एप्रिल या कालावधीत ही चाचणी होणार आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या सर्वच शाळांतील परीक्षा एकाच वेळी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, परीक्षा एप्रिलअखेरीस होणार असल्याने या वेळापत्रकावर आक्षेप घेण्यात आला असून, इतक्या उशिरा परीक्षा झाल्यास १ मे रोजी निकाल जाहीर कसा करणार, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एससीईआरटीने दिलेल्या सूचनांनुसार शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांना नियतकालिक मूल्यमापन चाचणीअंतर्गत तिसरी ते नववीसाठी प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी २च्या प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतील. इतर व्यवस्थापनाच्या शाळांनी सर्व प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करायच्या आहेत. पहिली ते दुसरीसाठी सर्व विषयांच्या आणि तिसरी ते नववीच्या अन्य विषयांच्या संकलित चाचणी २ लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर विकसित करून प्रचलित पद्धतीने मूल्यमापन करावे. नववीसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचणीशिवाय अन्य विषयांचे वेळापत्रक शाळास्तरावर ठरवण्यात यावे. पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षांसाठी शाळांनी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तयार करून परीक्षा घ्यायची आहे. नियतकालिक मूल्यमापन चाचणी ३ अंतर्गत दिलेल्या प्रश्नपत्रिका वार्षिक परीक्षा म्हणून वापरता येणार नाहीत. पाचवी आणि आठवीवगळता अन्य कोणत्याही इयत्तांसाठी दुबार परीक्षा होणार नाही. तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर घ्यावी. संकलित चाचणी २मध्ये परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी गैरहजर असल्यास तो शाळेत हजर झालेल्या दिवशी परीक्षा घ्यावी. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा निकाल महाराष्ट्र दिनी (१ मे) ध्वजारोहणानंतर जाहीर करावा, २ मेपासून शाळांना उन्हाळी सुटी सुरू होईल. या सूचना राज्य मंडळाव्यतिरिक्त शाळांना लागू असणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी या वेळापत्रकावर आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, की संकलित मूल्यमापन चाचणी घेण्याचे वेळापत्रक शाळांना त्यांच्या स्तरावर ठरवण्याची मुभा असायला हवी. सर्वसाधारणपणे १५ एप्रिलनंतर पालकांचे विद्यार्थ्यांसह गावी जाण्याचे नियोजन असते. त्याशिवाय २५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेतल्यास जास्त विद्यार्थिसंख्या असलेल्या शाळांमध्ये उत्तरपत्रिका तपासणी, निकाल तयार करणे, ऑनलाइन माहिती भरणे हे कामकाज करण्यासाठी वेळच मिळणार नाही. दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये घेऊन निकाल मे-जूनमध्ये जाहीर होतो, तर बाकी वर्गांसाठी परीक्षा आणि निकालासाठी वेळ मिळायला हवा.

राज्यातील शाळांमध्ये एकवाक्यता आवश्यक

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा साधारणपणे मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलमध्ये शाळा स्तरावरून घेतल्या जातात. एप्रिलच्या सुरुवातीलाच वार्षिक परीक्षा झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू असल्या, तरी विद्यार्थी उपस्थिती पुरेशी असत नाही. अशा पद्धतीने वर्षाअखेरीस परीक्षा आयोजित करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होतो. तसेच, प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी, उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी व्हावा, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) संचालकांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी २ आणि नियतकालिक मूल्यांकन २०२४-२५ यासाठी वेळपत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षांचे आयोजन होईल, या दृष्टीने कार्यवाही आणि नियोजन करावे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन नियोजनात बदल करायचा असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी एससीईआरटी संचालकांची परवानगी घेऊनच बदल करावा, असे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहेत.