लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : खोडद येथील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपच्या (जीएमआरटी) सहाय्याने भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने ३४ नवीन अतिविशाल रेडिओ स्रोत (जायंट रेडिओ सोर्सेस) शोधण्यात यश मिळवले. त्यापैकी काही रेडिओ स्रोत सर्वांत दूरचे खगोलीय घटक आहेत. शोध लागलेले रेडिओ स्रोत हे आजपर्यंत केलेल्या सर्वेक्षणांमध्ये विश्वातील सर्वांत मोठ्या खगोलीय घटकांपैकी असून, त्यांचा प्रचंड आकार आणि दुर्मीळता इतक्या मोठ्या आकारात कशी वाढली याचे खगोलशास्त्रज्ञांना कोडे पडले आहे.

खगोलशास्त्रज्ञ नेताई भुक्ता, सौविक माणिक, सब्यसाची पाल, सुशांत के. मोंडल यांचा समावेश होता. या संशोधनाचा शोधनिबंध अमेरिकन ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या ॲस्ट्रोफिजिकल जर्नल सप्लिमेंट सिरीजमध्ये (एपीजेएस) प्रसिद्ध झाला. २०१० ते २०१२ पर्यंत १५० मेगाहर्ट्झ रेडिओ लहरींवर अवकाशीय नकाशा करण्यासाठी जीएमआरटीचा वापर करून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. ते टीआयएफआर जीएमआरटी स्काय सर्व्हे (टीजीएसएस) म्हणून ओळखले जाते. हे सर्वेक्षण ९० टक्के आकाश व्यापते. या सर्वेक्षणातून शास्त्रज्ञांनी ३४ विशाल रेडिओ स्त्रोतांचे निरीक्षण केले.

आणखी वाचा- Lonavala Rain : लोणावळा, मावळमध्ये अतिमुसळधार पाऊस, कार्ला गडाला धबधब्याचे स्वरूप

महाकाय रेडिओ स्रोत विश्वातील सर्वांत प्रचंड संरचना आहेत. त्या लक्षावधी प्रकाशवर्षे पसरलेल्या आहेत. त्यांच्यामुळे अनेक दीर्घिका जोडल्या जातात. अतिविशाल रेडिओ स्रोताच्या मध्यभागी एक अतिप्रचंड कृष्णविवर आहे. या कृष्णविवराचे वस्तुमान सूर्याच्या दहा दशलक्ष ते एक अब्ज पट आहे. प्रचंड हालचाली होत असलेल्या कृष्णविवराच्या मध्यभागात सभोवतालचे पदार्थ खेचले जातात. आयनीकृत असलेले हे पदार्थ एक शक्तिशाली विद्युतचुंबकीय शक्ती तयार करतात. ही विद्युतचुंबकीय शक्ती कृष्णविवराच्या बाहेरच्या काठावर आणते. त्यातून प्रचंड तप्त तापमानाचे प्लाझ्मा जेट्स दीर्घिकेच्या दृश्यमान आकारापेक्षा कितीतरी जास्त अंतरावर पसरलेल्या रेडिओ उत्सर्जनाचे प्रचंड झोत तयार करतात.

अतिविशाल रेडिओ स्रोत त्यांच्या प्रचंड आकारामुळे रेडिओ दीर्घिकांच्या उत्क्रांतीच्या अंतिम टप्प्याची माहिती देतात. अतिविशाल रेडिओ स्त्रोतांची प्रचंड प्रक्षेपित लांबी रेडिओ स्रोतांची उत्क्रांती समजून घेण्यासाठी, मूळ दीर्घिकेपासून दूर असलेल्या झोतांना मर्यादित ठेवणाऱ्या आंतरतारकीय माध्यमाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे उदाहरण ठरते. मात्र, दोन रेडिओ स्रोतांच्या भागांना जोडणारे उत्सर्जन अनेकदा दिसत नसल्याने अतिविशाल रेडिओ स्रोत शोधणे आव्हानात्मक आहे.

आणखी वाचा-सामिष खवय्यांकडून ‘गटारी’ साजरी; हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव

तप्त नसलेला प्लाझ्मा कमी रेडिओ लहरींवर अधिक स्पष्टपणे शोधला जातो. त्यामुळे उच्च रेडिओ लहरींच्या सर्वेक्षणांपेक्षा कमी रेडिओ लहरींवरील सर्वेक्षणे अतिविशाल रेडिओ स्रोतांची संख्या ओळखण्यासाठी अधिक योग्य आहेत. दोन अतिविशाल रेडिओ स्रोत (J0843 0513 आणि J1138 4540) हे कमी घनतेच्या वातावरणात वाढतात या आजवरच्या समजाला आव्हान देतात. अतिविशाल रेडिओ स्रोतांचे गूढ उलगडण्यासाठी रेडिओ लहरींच्या विविध तरंगलांबीच्या निरीक्षणांवर आधारित तपशीलवार भौतिक गुणधर्मांसह शोध घेण्याचे नियोजन असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scientists discover 34 new supermassive radio sources research with gmrt pune print news ccp 14 mrj