पिंपरी चिंचवड: चोरीच्या आरोपावरून भंगार गोळा करणाऱ्या तीन व्यक्तींना लाकडी दांडके आणि हाताने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून थेट कायदा हातात घेत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना मारहाण करण्यात आली आहे. याबाबत तक्रार देण्यास कोणी पुढे न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही असे गुन्हे पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.
हेही वाचा : निवृत्त सरकारी अधिकारी महेश झगडे यांचा कस्तुरबा रुग्णालयाला मदतीचा हात
तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना मारहाण झाली आहे. लोखंडी सळई चोरल्याचा आरोप घेऊन लाकडी दांडक्याने आणि हाताने बेदम मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तळेगाव पोलिसांनी देखील ही घटना घडल्याचे म्हटले आहे. पण, कायदा हातात घेऊन त्या व्यक्तींना मारहाण करणे कितपत योग्य आहे याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. ज्या व्यक्तींनी मारहाण केली आहे त्यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रार द्यायला हवी होती. परंतु, हातात कायदा घेऊन मारहाण केली. या अगोदर देखील महाराष्ट्रात आणि परराज्यात चोरीच्या आरोपावरून केलेल्या मारहाणीत काहींचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.