‘तो’ भंगारचा माल घेणारा साधा माणूस. त्याच्याकडे भंगारात दोन कपाटे आली, त्यांच्यासाठी लगेच गिऱ्हाईकही मिळाले. गिऱ्हाईकाला विकण्यापूर्वी सहजच म्हणून त्याने कपाट तपासले, तर तिजोरीत एक कापडी पिशवी मिळाली. त्यात होते किलोपेक्षाही जास्त वजनाचे सोन्याचे दागिने. त्याने दागिन्यांची पिशवी उचलली आणि जशीच्या तशी मूळ मालकाकडे सोपवली. त्याची बक्षिशी म्हणून मूळ मालकाने या व्यावसायिकाला पाचशे रुपयांची बक्षिशी दिली!
अशी ही कथा आहे, घरी चालत आलेला लाखोंचा पण फुटकचा ऐवज नाकारणाऱ्या ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची. त्यांचे नाव सुभाष वडवराव! मूळचे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील तुळजापूरचे. सध्या ते पुण्यात शिवाजीनगर परिसरात राहतात. ते गेली २५ वर्षे पुण्यात दारोदार फिरून हातगाडीवर भंगार माल गोळा करतात. शिवाय ओळखीच्या कोणी बोलवले तर तेथे जाऊन भंगार विकत घेतात. अशाच प्रकारे गेल्या २२ डिसेंबरला त्यांना बांधकाम व्यावसायिक रमण निरगुडकर यांचा फोन आला. हिराबाग परिसरातील त्यांच्या परिचयाचे श्रीराम पेंडसे यांच्या घरी काही भंगार माल असल्याचे त्यांनी वडवराव यांनी सांगितले. त्यानुसार वडवराव पेंडसे यांच्या घरी गेले. पेंडसे यांच्याकडे आजीची दोन जुनी कपाटे होती. ती प्रत्येकी एक हजार रुपयाला विकत घेतली.
ही कपाटे विकत घेतल्यावर वडवराव यांना पुण्यात प्रभात रस्त्यावर त्या कपाटांसाठी गिऱ्हाईक मिळाले. ते देण्याआधी कपाट तपासून पाहावे तेव्हा त्यात एक कापडी पिशवी होती. ती उघडली तर ती पिशवी भरून सोन्याचे दागिने होते. त्यांचे वजन एक किलोपेक्षा जास्त होते. ही पिशवी मिळताच वडवराव यांनी लगेचच ते निरगुडकर यांना कळवले. मग निरगुडकर आणि वडवराव हे पेंडसे यांच्या घरी गेले आणि त्यांना सोन्याची पिशवी परत केली. त्या वेळी पेंडसे यांनी वडवराव यांचे आभार मानले आणि त्यांना पाचशे रुपयांची बक्षिशी दिली.
या प्रामाणिकपणासाठी रोटरी क्लब ऑफ अपटाऊन यांच्यातर्फे नुकताच सुभाष वडवराव यांचा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आता कष्टकऱ्यांचे ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्तेही त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
‘‘सुभाष वडवराव आणि माझी गेल्या दहा वर्षांपासून ओळख आहे. माझी बांधकामाची कामे असतात. तिथे अनेकदा भंगार असते. ते घेऊन जाण्यासाठी मी वडवराव याला सांगतो. आताही तसेच झाले, हिराबागेजवळील साठे कॉलनीत माझे काम सुरू आहे. त्या वेळी पेंडसे यांनी भंगार आहे, ते द्यायचे असल्याचे सांगितले. म्हणून मी वडवरावला सांगितलं होते. त्याच्या या कृत्यातून त्याचा प्रामाणिकपणा पाहायला मिळाला.’’
– रमण निरगुडकर, बांधकाम व्यावसायिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा