पिंपरी : पर्यटन व्हिसावर देशात आलेल्या बांगलादेशी महिलेबरोबर चिखलीतील भंगार व्यावसायिकाने विवाह करून तिला आश्रय दिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी बांगलादेशी महिलेसह भंगार व्यावसायिकाला अटक करण्यात आली. मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख (वय ३३, रा. तळवडे, मूळ उत्तर प्रदेश) आणि त्याची बांगलादेशी पत्नी (वय ३०) यांना अटक करण्यात आली.

चिखली ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला मूळची बांगलादेशी नागरिक आहे. तिचा पहिला पती बांगलादेशात वेल्डिंंगचे काम करतो. ही महिला २०१७ पासून पर्यटन व्हिसावर सातत्याने भारतात ये-जा करीत होती. मुंबईतही तिने काही दिवस वास्तव्य केले आहे. तिची शेख याच्याशी समाज माध्यमावरून ओळख झाली. डिसेंबर २०२१ मध्ये तिने पुन्हा पर्यटन व्हिसा काढला आणि शेख याला भेटायला ती चिखलीत आली. तिच्याबरोबर ती पहिल्या पतीपासून झालेल्या मुलालाही घेऊन आली.

महिला बांगलादेशी घुसखोर आहे हे माहिती असतानादेखील शेखने तिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला मुलगा आहे. गेल्या सव्वातीन वर्षांपासून ती चिखलीत राहत आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चिखली पोलिसांनी बांगलादेशी महिलेसह तिला आश्रय देणाऱ्या शेख याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक गोमारे तपास करीत आहेत.

बांगलादेशी पारपत्र जाळले

महिलेची पर्यटन व्हिसाची मुदत ७ एप्रिल २०२२ रोजी संपली. त्यानंतर बांगलादेशी महिलेला तिच्या देशात परत पाठवणे आवश्यक असताना शेख याने त्याच्या घरात तिला आश्रय दिला. बांगलादेशी असल्याचे कोणाला समजू नये यासाठी महिलेचे आणि तिच्या मुलाचे बांगलादेशी पारपत्र (पासपोर्ट) जाळून टाकण्यात आले. महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रही बनवून घेतले, असे पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले.