पुण्यातील सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे. अलीकडेच एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारची तिच्याच मित्राने निर्घृण हत्या केली. हे प्रकरण ताजं असताना आणखी एका विद्यार्थिनीवर कोयत्याने वार करण्यात आले आहे. यामुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. त्यांनी ट्वीट करून ही प्रतिक्रिया दिली.

अजित पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांनाही बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळण्यास वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो.”

हेही वाचा- VIDEO : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला

नेमकं प्रकरण काय?

२२ वर्षीय आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव याने आज (मंगळवारी) सकाळी सदाशिव पेठेत पेरुगेट चौकीजवळ एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. पीडित तरुणी कोथरूड येथील सुतरदारा भागात राहायला आहे. आरोपीने हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराचा पाठलाग करत त्याला पकडलं. पोलीसांनी आरोपी शंतनु लक्ष्मण जाधव वय २२ रा मुळशी डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.

हेही वाचा- “…अन् दर्शनाच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला”, आरोपी राहुलने कबुलीजबाबात सांगितला भयावह घटनाक्रम! 

आरोपी शंतनु जाधव हा पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. तिचा पाठलाग करून त्रास देत होता. त्याने सदाशिव पेठेत पावन मारुती मंदिराजवळ सकाळी तरुणीला गाठले. तरुणीला अडवून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तरुणीने त्याला झिडकारले. तेव्हा त्याने तिच्यावर कोयत्याने वार केले. आरोपी जाधव पसारा झाला . नागरिकांनी पाठलाग करून त्याला पकडले. अप्पा बळवंत चौकात त्याला चोप दिला.

हेही वाचा- १० वर्षात ५१ जणांनी ९२ वेळा केला बलात्कार; पीडितेचा पतीच निघाला ‘मास्टरमाइंड’, VIDEO पाहून महिलेला बसला धक्का

तरुणाच्या तत्परतेमुळे तरूणी बचावली

आरोपी शंतनु जाधवने तरूणीवर भर रस्त्यात कोयता उगारला आणि तिच्यावर हल्ला केला. त्यावेळी तेथून एक तरुण अभ्यासिकेत जात होता. त्याने हा प्रकार पाहिला आणि आरोपी जाधवचा प्रतिकार केला. तरुणाने प्रतिकार केल्याने आरोपी जाधव घाबरला आणि घटनास्थळावरून पळाला. पण नागरिकांनी पाठलाग करून त्याला अप्पा बळवंत चौक परिसरात पकडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scythe attack on female student in pune sadashiv peth ajit pawar reaction rmm