पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात मंगळवारी एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पीडितेच्याच एका पूर्व मित्राने कोयत्याने हा हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही तरुणांमुळे पीडित मुलीचा जीव वाचला आहे. पीडितेवर प्राथमिक उपचार करून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पोलिसांनी हल्लेखोराला अटक करून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनु लक्ष्मण जाधव (वय २२) असं आरोपीचं नाव असून तो मुळशी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपास केला असून संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. पुण्याचे झोन-१ चे डीसीपी संदीप सिंग गिल यांनी सांगितलं की, “काल (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. एका तरुणाने त्याच्या पूर्वीच्या मैत्रिणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी तरुण दोघंही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, पण कालांतराने त्यांच्यात काही मतभेद झाले.”

हेही वाचा- पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर…”

“दोघांमधील मैत्री पुढेही कायम ठेवण्याची मागणी आरोपीनं पीडित मुलीकडे केली. पण मुलीने आरोपीच्या मागणीला नकार दिला. यामुळे आरोपीला पीडितेचा राग आला. दरम्यानच्या काळात पीडित मुलगी पुण्याला राहायला आली आणि ती ‘इंटेरिअर डिझाइन’चा कोर्स करू लागली. त्यानंतर आरोपीही पुण्यात आला आणि त्याने तिचा पाठलाग सुरू केला. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण पीडितेनं आरोपीशी बोलण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीनं तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला,” असा घटनाक्रम डीसीपी गिल यांनी सांगितला.

हेही वाचा- पुणे: कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

“आम्ही आरोपीविरोधात आर्म अॅक्टसह आयपीसीच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलगी जखमी झाली आहे, मात्र तिला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे’, अशी माहिती डीसीपी संदीप सिंग गिल यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scythe attack on female stundet in pune police statement after investigation rmm
Show comments