पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन पदवी (बीसीए) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे राज्यातील महाविद्यालयांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. नामांकित महाविद्यालयांतील जागाही रिक्त राहिल्या असून, काही ठिकाणी ५० टक्क्यांपर्यंत जागा रिक्त राहिल्याची माहिती शिक्षण संस्थांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिरुरमघील घोड नदीपात्रातील गावठी दारू अड्ड्यावर छापा; पोलिसांकडून दीड लाखांची गावठी दारु जप्त

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) बीबीए, बीसीए हे अभ्यासक्रम स्वत:च्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा प्राप्त झाला आहे. हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी एआयसीटीईची मान्यता घ्यावी लागते. आतापर्यंत हे अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया महाविद्यालय स्तरावर राबवली जात होती. त्यामुळे एआयसीटीईच्या निर्णयाला देशभरातून विरोध होत न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. राज्यस्तरावर या अभ्यासक्रमांसाठी राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) समाइक प्रवेश परीक्षा (सीईटी), केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, न्यायालयीन प्रकरणासह दोन वेळा सीईटी घ्यावी लागल्याने प्रवेशप्रक्रियेला विलंब झाला. दोन्ही परीक्षांमध्ये मिळून सुमारे ५० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्यभरात सुमारे ४०० महाविद्यालयांत या अभ्यासक्रमांच्या एक लाखापेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रक्रिया विलंबाचा फटका महाविद्यालयांतील जागांना बसला आहे.

हेही वाचा >>> समाविष्ट गावांतील मतदार ‘निर्णायक’

या पार्श्वभूमीवर अनएडेड इन्स्टिट्यूट इन रुरल एरियाचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, की बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेपासूनच गोंधळ झाला होता. त्यामुळे जेमतेम ५० टक्केच प्रवेश झाले आहेत. राज्य शासन, सीईटी सेलचे धोरण चुकते आहे. सीईटी उशिरा होत असल्याने त्याचा फटका महाविद्यालयांना बसतो, तर खासगी विद्यापीठांना विद्यार्थी मिळून त्यांचा फायदा होतो. त्यामुळे एकूणच सीईटीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काही अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र सीईटी घेण्यापेक्षा समान सीईटी घेतल्यास प्रक्रिया वेगवान होऊ शकते. ही बाब सीईटी सेलच्या निदर्शनास वारंवार आणून देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. दरम्यान, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला बराच विलंब झाल्याने विद्यार्थ्यांनी वाट पाहून अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. नामांकित महाविद्यालयांनाही त्याचा फटका बसला. काही ठिकाणी तर ५० टक्क्यांपर्यंत जागा रिक्त राहिल्या आहेत, असे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seat for bba bca courses in reputed colleges remain vacant pune print news ccp14 zws