लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून सोमवारी अटक केली. सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
अख्तर अली शेख (वय २८, रा. कोंढवा, मूळ रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात यापूर्वी रवींद्रकुमार कनोजिया (रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने मंगळवारपर्यंत (१५ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शेख, कनोजिया यांच्याबरोबर असलेला एक साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता.
आणखी वाचा-पुणे : मार्केट यार्डात सोसायटीच्या आवारात शिरुन वाहनांची जाळपोळ
या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी बोपदेव घाटाच्या परिसरातील ४५ गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. तसेच, पुणे जिल्ह्यातील घाट तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली होती. आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून ६० पथके तयार करण्यात आली होती. बोपदेव घाटामार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली होती. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १० ऑक्टोबर रोजी येवलेवाडी परिसरातून कनोजियाला अटक करण्यात आली होती.
चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, सुनील पवार, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, अमोल राऊत आणि पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले.
आणखी वाचा-पिंपरी : खेडमध्ये पोलिसाच्या घरावर सशस्त्र दरोडा; प्रतिकार करताना पोलीस जखमी
आरोपी शेखने तीन विवाह केले असून, त्याची पत्नी प्रयागराज परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. बोपदेव घाट प्रकरणानंतर ४ ऑक्टोबर रोजी नागपूरमार्गे उत्तर प्रदेशात पसार झाला. तो कोढव्यातील एका भंगार माल खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाकडे काम करत होता.