पुणे : करोनाच्या तीव्र संसर्गामुळे मेंदूतील नियंत्रण केंद्राच्या भागात सूज येत असल्याची बाब संशोधनातून समोर आली आहे. मेंदूवर सूज आल्याने तिथे इजा होऊन रुग्णांमध्ये श्वसनास त्रास, थकवा आणि मानसिक ताण अशी लक्षणे दीर्घकाळ दिसून आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. करोना संकटाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णालयात दाखल ३० रुग्णांचे उच्च क्षमतेचे एमआरआय स्कॅन संशोधकांनी तपासले. करोनावरील लस येण्याआधीच्या काळातील हे रुग्ण होते. या रुग्णांच्या मेंदूवर सूज आल्याचे दिसून आले. त्यात शरीराची प्रमुख कर्तव्ये पार पाडण्यास जबाबदार ठरणाऱ्या मेंदूतील नियंत्रण केंद्राच्या भागाचा समावेश होता. या रुग्णांमध्ये तीव्र करोना संसर्गामुळे प्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया होऊन मेंदूच्या नियंत्रण केंद्राच्या भागात सूज आली. त्यामुळे रुग्णांमध्ये दीर्घकाळ करोनाची लक्षणे दिसून येऊन त्यांना त्रास सुरू राहिला, असे संशोधनातून उघड झाले आहे.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड : अजित पवार बारामती विधानसभा लढणार?; पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले…

दीर्घकालीन करोना संसर्गाबाबत संशोधक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चर्चा सुरू होण्याआधी हे संशोधन सुरू झाले होते. दीर्घकालीन करोना संसर्गाचा त्रास ब्रिटन आणि स्कॉटलंडमध्ये सुमारे २० लाख जणांना झाल्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवर ही संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. दीर्घकालीन करोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने श्वसनास त्रास आणि थकवा ही लक्षणे दिसून आली. यामागे मेंदूच्या नियंत्रण केंद्रावर आलेली सूज कारणीभूत असल्याचे अखेर समोर आले आहे. दीर्घकालीन करोना रुग्णांमध्ये मेंदूला झालेली इजा सहा महिन्यांनंतरही स्कॅनमध्ये दिसून येत असल्याचे संशोधनातून उघड झाले आहे.

संशोधन कशा पद्धतीने…

केंब्रिज विद्यापीठातील संशोधिका डॉ. कॅटरिना रुआ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह हे संशोधन केले. यासाठी त्यांनी उच्च क्षमतेचे सात टेस्ला एमआयआर स्कॅनर वापरले. या स्कॅनरच्या साहाय्याने रुग्णांच्या मेंदूच्या उच्च क्षमतेच्या प्रतिमा घेण्यात आल्या. त्यात मेंदूवर आलेली सूज आणि मेंदूच्या नियंत्रण केंद्रात झालेले बदल निदर्शनास आले. दीर्घकालीन करोना संसर्ग होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले.

आणखी वाचा-पुण्यात झिकाने पुन्हा काढले डोके वर! रुग्णसंख्येत वाढ सुरूच; रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक

दीर्घकालीन करोना संसर्गाची लक्षणे

  • वारंवार थकवा
  • श्वसनास त्रास
  • मानसिक ताण

दीर्घकालीन करोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मेंदूवर सूज आल्याचे निदर्शनास आले आहे. मेंदूतील नियंत्रण केंद्राला इजा झाल्यामुळे या रुग्णांमध्ये दीर्घकाळ लक्षणे दिसून आली. -डॉ. कॅटरिना रुआ, संशोधिका, केंब्रिज विद्यापीठ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secret of long term corona infection is finally revealed research by researchers at university of cambridge pune print news stj 05 mrj