पुणे : रेल्वे गाडीतून ज्वालाग्राही वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. असे असतानाही फटाके घेऊन रेल्वेतून प्रवास करणे प्रवाशाला महागात पडले आहे. या प्रवाशाला रेल्वे सुरक्षा दलाच्या श्वान पथकाने पकडले. त्याच्यावर रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परळी- मिरज पॅसेंजर या गाडीत हा प्रकार घडला. ही गाडी मंगळवारी (ता. २०) मिरज स्थानकावर पोहोचली त्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक राकेश कांबळे आणि अन्य कर्मचारी श्वान चेतक आणि खंड्या यांना बरोबर घेऊन तपासणी करीत होते. त्या वेळी गाडीतून एक प्रवासी कापडी पिशवीत काही वस्तू घेऊन खाली उतरला. त्या वेळी चेतक श्वानाने त्या कापडी पिशवीचा वास घेतला आणि त्याच्या हँडलर जवानाला काही संशयास्पद वस्तू असल्याचा इशारा केला. चौकशीत त्या प्रवाशाने पिशवीत काही फटाके घेऊन प्रवास केल्याचे कबूल केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला ठाण्यात नेऊन त्याचा जबाब नोंदवण्यात आला. रेल्वे कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा-पुण्यात रस्ते दुरुस्तीसाठी ‘पॉलिमर काँक्रिट’चा प्रयोग

नियम पाळून कारवाई टाळा

प्रवासादरम्यान स्टोव्ह, गॅस सिलिंडर, कोणतेही ज्वलनशील रसायन, फटाके, ॲसिड घेऊन प्रवास करण्यास मनाई आहे. तसेच, प्रवासादरम्यान धूम्रपान करण्यासही बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. सर्व प्रवाशांनी या नियमांचे पालन करून कारवाई टाळावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Security dog caught bag of crackers from a train pune print news stj 05 mrj