पुणे : शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक…दुपारी २ वाजून २२ मिनिटांची वेळ…अचानक एक चिमुरडा फलाटावरून मेट्रोच्या ट्रॅकवर पडला. त्याला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात त्याची आईही ट्रॅकवर पडली. तेवढ्यात वेगाने दोन्ही दिशेने मेट्रो गाड्या त्यांच्या दिशेने येऊ लागल्या. सुरक्षारक्षकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबविण्याचे बटण दाबल्याने दोघांचे प्राण वाचू शकले.
हेही वाचा >>> राज्यातून द्राक्ष निर्यातीला वेग; अनुकूल वातावरणामुळे उच्चांकी निर्यातीचा अंदाज
जिल्हा न्यायालयात शुक्रवारी ही घटना घडली. एक महिला तीन वर्षांच्या मुलासोबत मेट्रोने प्रवास करीत होती. ती मेट्रोची वाट पाहात फलाटावर थांबली होती. त्यावेळी मुलगा फलाटावर धावत असताना अचानक मेट्रोच्या ट्रॅकवर पडला. हे पाहून त्याची आई मुलाला ट्रॅकवरून वर खेचण्यासाठी पुढे सरसावली. ती मुलाला वर खेचत असताना तोल जाऊन ती ट्रॅकवर पडली. इतर प्रवाशांनी धाव घेत त्या दोघांना खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी दोन्ही ट्रॅकवरून दोन गाड्या वेगाने येत होत्या.
हेही वाचा >>> नेट परीक्षेचा निकाल जाहीर, ‘इतके’ उमेदवार ठरले पात्र
गाडी येत असल्याचे पाहून मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत फलाटावरील आपत्कालीन स्थितीत मेट्रो थांबविण्याच्या बटणाकडे धाव घेतली. त्यांनी वेळीच बटण दाबल्याने ट्रॅकवर पडलेल्या मायलेकांपासून सुमारे ३० मीटर अंतरावर गाड्या येऊन थांबल्या. त्या कालावधीत प्रवाशांनी यशस्वीपणे या मायलेकांना ट्रॅकवरून फलाटावर खेचून घेतले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचू शकले.
मेट्रोकडून बांगर यांचा सत्कार मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखत दोन जणांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. महामेट्रोने बांगर यांचा सत्कार केला. बांगर यांच्यामुळे इतरांनाही आपत्कालीन स्थितीत प्रसंगावधान राखत मदत करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी सांगितले.