पुणे : जालन्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. या घटनेचे पडसाद शहरात उमटू नये म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. जालन्यातील सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले.
हेही वाचा >>> राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा; १०८ शिक्षक मानकरी
पोलिसांनी शुक्रवारी आंदोलकांवर लाठीमार केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शहरात अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना संवेदनशील भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस मुख्यालयात राखीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात आयोजित केली जाणारी आंदोलनांची माहिती संकलित करण्यात येणार असून, महामार्गांवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.