लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: लोहगाव विमानतळावर विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद झाल्याची पाहणी करणारा सुरक्षा अधिकारी शिडीवरुन पडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी एअर एशिया विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवियन अँथोनी डोमनिक (वय.३३, रा. लोहगाव, मूळ रा. तामिळनाडू) असे मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरक्षा अधिकारी डाेमनिक यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता दुघर्टनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एअरएशिया कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक एस. अजय हरिप्रसाद (रा.लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवियन डोमनिक यांची पत्नी अवली फ्रान्सकेन विवियन (वय २९, रा. तामिळनाडू ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-येरवडा कारागृहात मोबाइल संच बाळगणाऱ्या सात कैद्यांवर गुन्हा

एअर एशिया विमान कंपनीत विवियन डोमनिक सुरक्षा अधिकारी आहेत. विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद झाली की नाही, याची पाहणी करण्यात येते. शिडीवर चढून विमानाची दारे बंद झाले काही नाही, याची तपासणी करण्याचे काम सुरक्षा अधिकारी विवियन डोमनिक यांच्याकडे सोपविण्यात आले होते. १३ एप्रिल रोजी लोहगाव विमानतळावर विमान उतरल्यानंतर डोमनिक शिडीचा वापर करुन विमानाच्या दरवाज्याजवळ गेले. त्यांनी विमानाचे दारे बंद झाली का नाही, याची तपासणी केली. शिडीवरुन उतरत असताना तोल जाऊन ते खाली पडले.

विवियन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तामिळनाडूतील मूळगावी विवियन यांचा अंत्यविधी पार पडले. त्यानंतर त्यांची पत्नी अवली पुण्यात आल्या. त्यांनी नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे अवली यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. वाकडे तपास करत आहेत.

Story img Loader