पुणे : आधुनिक गोष्टींमुळे दैनंदिन जीवन अधिकाधिक आरामदायी होत आहे. याचवेळी शारीरिक हालचाल कमी होऊ लागली आहे. त्यातच सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे अनेकांना कायमची पाठदुखीचा त्रास सुरू होत आहे. जास्त काळ एकाच ठिकाणी बसल्याने मणक्यावर गंभीर परिणाम होत आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याचा सल्ला अस्थिविकारतज्ज्ञांनी दिला आहे.

सध्याच्या आधुनिक डिजिटल युगात काम करणे अधिक सोपे झाले आहे. तुम्हाला एकाच जागी बसून अनेक कामे करता येतात. मात्र, याचे अनेक दुष्परिणामही समोर येऊ लागले आहेत. बैठ्या जीवनशैलीचे मणक्यावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. त्यातून अनेकांना कायमची पाठदुखी जडत आहे. अनेक रुग्णांमध्ये तर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचेही अनेक वेळा दिसून येते. जागतिक मणका दिनाच्या निमित्ताने अस्थिविकारतज्ज्ञांनी बैठी जीवनशैली आणि त्यामुळे होणाऱ्या मणक्याच्या विकारांबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.

आणखी वाचा-दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकाबाबत राज्य मंडळाचे महत्त्वाचे स्पष्टीकरण… नेमके झाले काय?

याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिविकार विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के म्हणाले की, अनेक जणांचे कार्यालयीन काम बैठ्या स्वरूपाचे असते. घरी आल्यानंतरही ते मोबाईल पाहत तासनतास बसून असतात. त्यांच्या बसण्याची पद्धत चुकीची असते. त्यातून त्यांच्या मणक्यावर ताण येऊन पाठदुखीचा त्रास सुरू होतो. हा त्रास वाढत जाऊन मणक्याला गंभीर दुखापत होते. अशा वेळी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तींना शारीरिक हालचाल जास्तीत जास्त करण्यावर भर द्यायला हवा.

रुबी हॉल क्लिनिकमधील अस्थिशल्यविशारद डॉ. श्रीकांत दलाल म्हणाले की, आजकाल तरुणांमध्ये बैठ्या जीवनशैलीचा प्रभाव वाढला आहे. याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचालीचा अभावही वाढला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या पद्धतीमुळेही यात भर पडली आहे. सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे मणक्यावर परिणाम होतात. त्यात मणक्याला बाक येणे, स्नायूंचा कमकुवतपणा, तीव्र पाठदुखी यासारखे त्रास सुरू होतात. याचबरोबर मणक्यात अंतर पडण्यासारखे प्रकारही होतात. याचा परिणाम तरुणांवर शारीरिक आणि मानसिक पातळीवर होतो. कारण त्यांच्या दैनंदिन जीवनावर याचे गंभीर परिणाम होतात.

आणखी वाचा-इंदापूरनंतर महायुतीला दौंडमध्ये धक्का, माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांच्या भेटीला

बैठ्या जीवनशैलीमुळे त्रास

  • मणक्यावर ताण येऊन पाठीला पोक
  • पाठीचे स्नायू कमकुवत होणे
  • तीव्र पाठदुखी
  • मणक्यात अंतर पडणे

पाठदुखी टाळण्यासाठी काय कराल…

  • नियमितपणे व्यायाम करा.
  • बसण्याच्या योग्य सवयींचा अवलंब करा.
  • ठराविक वेळाननंतर शारीरिक हालचाल करा.
  • डिजिटल उपकरणांचा वापर मुलांसाठी मर्यादित ठेवा.
  • वजन नियंत्रणात ठेवा.