काँग्रेस नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी नाटय़ परिषदेच्या माध्यमातून ज्येष्ठ खासदार शरद पवार यांचा मोठा सत्कार चिंचवडमध्ये घडवून आणला. शहराची पुरती नस माहिती असलेल्या पवारांनी आपल्या भाषणात येथील सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली. प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे ऊर्फ माउलींचे ‘बघू’, सत्कारासाठी भाऊसाहेबांनी केलेला ‘गनिमी कावा’ आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीत असताना केलेली ‘ती’ बंडखोरी, यावर पवारांनी सूचक टोलेबाजी केली, त्यास उपस्थितांनीही भरभरून दाद दिली.
पवार म्हणाले, माउली विधिमंडळातील जुने सहकारी. गडय़ाला राग आलेला आपण कधी पाहिला नाही. एखादे काम करायचे म्हटले की शांत माउलींचे ‘बघू’ हेच उत्तर ठरलेले असते. ही उद्योगनगरी अण्णासाहेब मगरांनी उभी केली. पूर्वी इथे गावे होती. पाटील व शेतकरी मंडळी राहायची. अण्णांनी त्यांची मोट बांधली व नगरीचे चित्र बदलले. नंतरच्या काळात रामकृष्ण मोरे व अजित पवारांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. गप्पा मारण्यापेक्षा झटक्यात निर्णय, पटकन काम, ही अजितच्या कामाची वेगळी पध्दत आहे. काम झालेच पाहिजे, असा त्याचा आग्रह असतो. अजितइतका कडकपणा मला कधी जमला नाही. पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडमध्ये वेगाने बदल झाला, हे मात्र नक्की. गेल्या अनेक वर्षांपासून नाटय़ परिषदेची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या भाऊसाहेबांना या क्षेत्रात स्पर्धा नाही. भाऊसाहेब करतोय, त्याला करू द्यात, अशी उदात्त भूमिका त्यांचे सहकारी घेतात. मात्र, विधानसभा वगैरे आल्या की ही भूमिका बदलते, असे सांगून ‘बरोबर ना लक्ष्मण’, असे समोर बसलेल्या जगतापांना पाहून पवार म्हणाले. भोईरांच्या विरोधात जगतापांनी केलेल्या बंडखोरीचा विषय लक्षात आल्याने सभागृहात हास्याची जोरदार लकेर उमटली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: See guerrilla warfare laxman jagtap rebel pcmc sharad pawar