माहिती तंत्रज्ञानात नवी बीजे पेरणारे

‘पुणे तिथे शिकवण्या ढिगाने’ अशीच परिस्थिती. तरीही प्रत्येक शिकवणीला एकसारखी लोकप्रियता लाभत नाही. स्वतंत्र ‘ब्रँड’ म्हणून आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणि पुण्याबाहेर विस्तार करणाऱ्या शिकवण्या आणखी कमी. अशा काही मोजक्या ‘ब्रँड’मधले एक नाव म्हणजे ‘सीड इन्फोटेक’. या ‘सीड’चा शेतीशी काही संबंध नसला तरी माहिती तंत्रज्ञानात प्रत्यक्ष काम करताना लागणाऱ्या ज्ञानाची बीजे मात्र त्यांनी नक्कीच पेरली. माहिती तंत्रज्ञानाचे ‘हब’ म्हणून विकसित झालेल्या पुण्यात तर त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केलेच, पण अगदी दुबईपर्यंत मजल मारली.

‘सीड इन्फोटेक’ हे नाव माहिती तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन नाही. अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या बाहेर प्रत्यक्ष काम करताना लागणारी माहिती तंत्रज्ञान कौशल्ये शिकवणारी ही संस्था हा पुण्यात सुरू झालेला ‘ब्रँड’ आहे, हे मात्र अनेकांना माहीत नसते. तांत्रिक पाश्र्वभूमी भक्कम असलेल्या आणि शिकवण्याची आवड असलेल्या काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली, वाढवली आणि आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात ठिकठिकाणी आणि परदेशातही त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू झाले.

नरेंद्र बऱ्हाटे हे माहिती तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण वर्गामधील लोकप्रिय नाव. बऱ्हाटे हे आधी पुण्यातच ‘एआरडीई’मध्ये (आर्मामेंट रीसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट) शास्त्रज्ञ म्हणून नोकरीस होते. पगार आणि सरकारी सुविधा चांगल्या मिळत असतानाही त्यांना म्हणावे तसे समाधान मिळत नव्हते.  व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना दुसरे काय करावे हा विचार पक्का होत नव्हता. एकदा अभियांत्रिकीशी संबंधित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी त्यांना बोलवले गेले आणि आपल्याला शिकवता येते याची त्यांना नव्याने ओळख झाली. त्यातून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिकवण्या घेण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळायला लागली. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अनेक गोष्टी प्रत्यक्ष नोकरी करताना बदललेल्या तंत्रज्ञानानुसार कालबाह्य़ ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर अभ्यासक्रमाची पुस्तके शिकवण्याऐवजी नोकरीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी शिकवाव्यात असा विचार समोर आला.

नरेंद्र बऱ्हाटे यांच्यासह चार समविचारी लोकांनी एकत्र येऊन शिकवण्यांचा व्यवसाय सुरू करायचे ठरवले. एक भागीदार केदार सरस्वते यांच्या आजीच्या अध्र्या फ्लॅटमध्ये १९९४ मध्ये म्हात्रे पुलाजवळ आठ संगणकांसह शिकवण्या सुरू झाल्या. प्रत्येकाने २५ हजार भांडवल व्यवसायात घालावे असे चारही भागीदारांनी ठरवले. या भांडवलासाठी बऱ्हाटे यांच्या पत्नी भारती यांनी त्यांचे सोन्याचे दागिने मोडले. नोकरीचे दोर कापल्याशिवाय व्यवसायात पूर्ण लक्ष घालणे शक्य होणार नसल्यामुळे त्यांनी नोकरीही सोडली. सुरुवातीला आठच संगणकांमुळे शिकवण्यांना मर्यादा होत्या, पण १९९५ मध्ये ‘सीड’ कर्वे रस्त्यावर सुरू झाले आणि विस्तार होऊ लागला. मुंबई, कोल्हापूर अशी केंद्रेही सुरू झाली. २००६ मध्ये कर्नाटक हायस्कूलजवळ नालंदा हे प्रशिक्षण केंद्र ‘सीड’ने सुरू केले. एका वेळी ६०० लोक शिकू शकतील असे हे मोठे केंद्र आहे.

शिकवण्यांसारख्या व्यवसायात – जिथे गुणवत्तेला महत्त्व असते, तिथे मोठय़ा संख्येने ‘फ्रँचायझी’ दिल्यास गुणवत्ता टिकवली जातेच असे नाही, हे त्यांनी सुरुवातीपासून ध्यानात ठेवले. त्यामुळे त्यांनी नवीन केंद्रांचा विस्तार हळूहळू केला आणि बाहेरच्या केंद्रात शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी ठरावीक पात्रता निश्चित केली. शिक्षण क्षेत्रातील व्यवसायांमध्ये अनेकदा गुंतवणूक करणारे लोक व व्यवस्थापक हे स्वत: शिक्षणात काम करणारे नसतात. ‘सीड’ने हे जाणीवपूर्वक टाळले. सध्या त्यांच्या असलेल्या चार भागीदारांपैकी तिघे – म्हणजे नरेंद्र बऱ्हाटे आणि कार्यकारी संचालक श्रीकांत रासने व राजेश वर्तक यांना तंत्रज्ञानाची पाश्र्वभूमी आहे. तर भारती या व्यसायातील प्रशासकीय भाग व ब्रँडिंग सांभाळतात.

मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल, एचपी, एसएपी अशा विविध कंपन्यांबरोबर ‘सीड’ची प्रशिक्षण देण्यासंबंधी भागीदारी आहे. ‘सीड’ची केवळ पुण्यातच नऊ केंद्रे आहेत, शिवाय राज्यातील केंद्रे वेगळीच. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्यांनी देशात मिळून एकूण ४७ केंद्रे सुरू केली आहेत. दुबईतही ‘सीड’चे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू आहेत. आता मात्र नवीन फ्रँचायझी देणे थोडेसे कमी करून ‘ऑनलाइन’ प्रशिक्षण वर्गावर लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा विचार आहे. अभ्यासक्रमांमधील काही भाग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षकांकडून शिकता यावा व उर्वरित शिकवणी ‘ऑनलाइन’ उपलब्ध व्हावी, असे ‘ब्लेंडेड मॉडेल’ त्यांना आणायचे आहे.

पुणेरी माणसांनी सुरू केलेल्या या व्यवसायाचा पाया पुणेकरांना खूप महत्त्वाच्या वाटणाऱ्या ‘गुणवत्ता’ या निकषावर उभा आहे. गुणवत्ता चांगली असेल तर अधिक पैसे देण्यास पुणेकर तयार होतात, मात्र गुणवत्तेशी तडजोड करत नाहीत, असा अनुभव भारती बऱ्हाटे आवर्जून सांगतात. पुणेरी बाण्याचे ‘सीड’ने जपलेले आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सर्व व्यवहार रीतसर पावतीवर करणे. गेल्या तेवीस वर्षांत काळ्या पैशाचा एकही व्यवहार न केल्याचे भारती नमूद करतात. कोणताही व्यवसाय करताना शांत झोप महत्त्वाची आणि गुणवत्ता पाळू शकलो नाही, तर तो व्यवसाय अल्पायुषी ठरेल, ही तत्त्वे ‘सीड’ने पाळल्याचे त्या सांगतात.

‘पुणे तिथे शिकवण्या ढिगाने’ अशी परिस्थिती असतानाही स्वतंत्र ‘ब्रँड’ म्हणून आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणि पुण्याबाहेर यशस्वीपणे विस्तार करू शकणाऱ्या शिकवण्या कमीच. अशा काही मोजक्या ‘ब्रँड’मध्ये ‘सीड इन्फोटेक’ने आपले बस्तान बसवले. या ‘सीड’चा शेतीशी काही संबंध नसला तरी माहिती तंत्रज्ञानात प्रत्यक्ष काम करताना लागणाऱ्या ज्ञानाची बीजे मात्र त्यांनी नक्कीच पेरली.

sampada.sovani@expressindia.com