पिंपरी : शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी या नद्यांचे पुनरुज्जीवन करताना नदीची वहन क्षमता कमी होता कामा नये, नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे, पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याची काळजी घ्यावी. त्याबाबत केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून पडताळणी करून नव्याने अर्ज सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने (एसईआयएए) महापालिकेला दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी २४.३४ किलोमीटर, इंद्रायणी नदीची एकूण लांबी २०.८५ किलोमीटर आहे. तर, मुळा नदी शहराच्या सीमेवरून दहा किलोमीटर अंतर वाहते. तीनही नद्यांसाठी एकूण तीन हजार ५०६ कोटींचा खर्च महापालिका करणार आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याच्या खर्चासाठी महापालिकेने दोनशे कोटींचे कर्जरोखे २७ जुलै २०२३ रोजी काढले आहे. वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या मुळा नदीच्या विकासासाठी हा निधी वापरण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

हेही वाचा…पुणे : मॉडेलिंगसाठी मैत्रिणीला नेल्याने तरुणावर कोयत्याने वार

नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाच्या राज्य पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाची (एसईआयएए) मंजुरी आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने परवानगीचा अर्ज केला होता. परंतु, तो फेटाळण्यात आला. नदीचे पुनरुज्जीवन करताना पूर पातळी वाढणार नाही. भारतीय मानकशास्त्राचे पालन करावे. नदीची वहन क्षमता कमी होता कामा नये, नदीचे शुद्धीकरण झाले पाहिजे. पर्यावरणीय समतोल साधला जाईल, याबाबत केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन केंद्र यांच्याकडून पडताळणी करावी. त्यानंतरच अर्ज मंजुरीसाठी पाठविण्याची सूचना ‘एसईआयएए’ने केली. त्यानुसार महापालिकेने पडताळणी करून घेतली असून, मान्यतेसाठी अर्ज केला जाणार आहे.

पर्यावरण अभ्यासक सारंग यादवाडकर म्हणाले की, ‘सीडब्ल्यूपीआरएस’ यांच्याकडून पडताळणी करून घेतल्यामुळे नदी पुनरुज्जीवनामध्ये त्रुटी राहणार नाहीत. या निर्णयाचे स्वागत करतो.

हेही वाचा…मोठी बातमी : पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नाहीच; प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचा महामेट्रोचा दावा

पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले की, ‘एसईआयएए’ने सांगितल्याप्रमाणे त्रुटींची पूर्तता केली आहे. ‘सीडब्ल्यूपीआरएस’ यांच्याकडून पडताळणी करून घेतली आहे. त्यानुसार मंजुरीसाठी अर्ज केला जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seiaa directs pimpri chinchwad municipality to ensure indrayani and pavana river revival preserves carrying capacity and ecological balance pune print news ggy 03 psg