राज्य उत्पादन शुल्क विभागाने तळेगाव दाभाडे येथे छापा टाकून सुमारे ८७ लाख ८९ हजार ५२० रुपये किमतीच्या विदेशी मद्यासह एक कोटी पाच लाख सात हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हॉटेल शांताई समोर रस्त्यावर सापळा रचून गोवा राज्यनिर्मित आणि केवळ गोवा राज्यात विक्रीला असलेला विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणारा ट्रक जप्त करून कारवाई करण्यात आली. या ट्रकमधील विदेशी मद्याची १२६७ खोकी जप्त करण्यात आली.
हेही वाचा >>>पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना डिसेंबरपासून सुरुवात
मद्य आणि वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत एक कोटी पाच लाख सात हजार ५२० रुपये आहे. वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार (वय २४, रा. तांबोळे, ता. मोहोळ), देविदास विकास भोसले (वय २९, रा. खवणी, ता. मोहोळ) यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली.