लॅपटॅाप, दुचाकी, दागिने असा ९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोसायटीतील रखवालदाराकडे केबल, वायफाय दुरुस्तीची बतावणी करून भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेला तरूण मूळचा ओैरंगाबादमधील असून त्याच्याकडून सात लॅपटॅाप, एक दुचाकी, सोन्याचे दागिने असा नऊ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रज्वल गणेश वानखेडे उर्फ रेवणनाथ (वय २५, रा. ओैरंगाबाद) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कसबा पेठेतील ओंकार सोसायटीत भरदिवसा घरफोडी झाली होती. याबाबत सागर कैलास भोसले (वय ३७) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. चोरट्याचे वर्णन पोलिसांना मिळाले होते. संशयित चोरटा नाना पेठेतील एका हाॅटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेतील निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
वानखेडे उच्चशिक्षित असून तो ओैरंगाबादमधून पुण्यात घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी आला होता. त्याच्याकडून नऊ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक सुशील बोबडे, समीर माळवदकर, अभिनय चौधरी, मेहबूब मोकाशी, राकेश क्षीरसागर आदींनी या प्रकरणाचा तपास करून चोरट्याला पकडले.

समाजमाध्यमावरील ध्वनीचित्रफित पाहून घरफोड्या
वानखेडे यांना संगणक विषयक अभ्यासक्रम (एमसीए-सॅाफ्टवेअर ) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची नोकरी गेली होती. घरफोडीचे गुन्हे कसे करायचे, याबाबतची ध्वनीचित्रफित त्याने समाजमाध्यमावर पाहिली होती. त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले.

Story img Loader