पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (एनएमएमएस) शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यंदा महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ विद्यार्थी शिष्यवृत्ती कोटा निश्चित केला आहे.

परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे २००७-०८पासून एनएमएमएस शिष्यवृत्ती योजना परीक्षा घेतली जाते. राज्यात परीक्षा परिषदेतर्फे २२ डिसेंबर रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा २ लाख ४८ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी दिली. त्यानंतर ७ फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची यादी जाहीर करून विद्यार्थ्यांच्या जात, दिव्यांगत्व, जन्मदिनांक अशी दुरुस्ती असल्यास १८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

प्राप्त दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. राज्याच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे सातवी, आठवीची विद्यार्थीसंख्या, १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आला आहे.

येथे पाहता येईल नाव निवडयादी

www.mscepune.in आणि https://mscenmms.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे या योजनेचा उद्देश आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांना नववी ते बारावी या चार वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.