महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजने अंतर्गत कर्ज खात्यांची माहिती भरण्यासाठी राज्यातील ६३ बँकांची निवड करण्यात आली आहे. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत माहिती भरल्यानंतर अर्जाची छाननी होऊन मार्चपासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ रोजी थकीत असलेले आणि १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे अल्पमुदत पीककर्ज आणि पीक पुनर्गठित कर्ज माफ होणार आहे. लाभार्थ्यांची माहिती भरण्यासाठी १ फेब्रुवारीपासून शासनाने पोर्टल कार्यान्वित केले असून त्यासाठी विविध ६३ बँका निवडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत आणि सहकारी मिळून ३० आणि खासगी ३३ बँका आहेत.