स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृत सरोवर योजना’ राबविली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ९० तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील २५ तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम पूर्ण झाले आहे, तर पुढील टप्प्यासाठी ५० तलावांची कामे सुरू आहेत.केंद्र शासनाच्या अमृत सरोवर योजनेच्या माध्यमातून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवले जात आहे. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पहिल्या टप्प्यातील २५ तलावांच्या पुनरुज्जीवनाची कामे पूर्ण झाली असून स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) या तलावांवर गावातील स्वातंत्र्य सैनिक, ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य, पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पावसाळ्यात नवीन तलावांची निर्मिती करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तर पुढील वर्षासाठी नवीन ५० तलावांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : महापालिका, ‘पीएमआरडीए’ला न्यायालयाची नोटिस ; अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत २९ नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

जिल्ह्यातील काही गावांत अमृत सरोवरांची निर्मिती करता येत नसेल, त्या ठिकाणी उपलब्ध तलावातील गाळ काढणे, तलावाचे पुनरुज्जीवन करणे आदी कामे करून तलावातील पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, १५ वा वित्त आयोग, कृषी सिंचन योजना यासह इतर योजनांचा निधी वापरला जात आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत अमृत सरोवर योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात ७५ तलावांची निवड करण्यात येणार होती. मात्र, पुणे जिल्ह्यात ९० तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील ४८ ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे, तर त्यातील २५ तलावांचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात ५० तलावांची कामे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील २५ तलावांचे काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. ५० तलावांची कामे २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असे रोहयोच्या उपजिल्हाधिकारी डॉ. वनश्री लाभशेटवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection of 90 lakes in pune district under amrit sarovar scheme pune pune print news amy