पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली असताना नवनाथ जगताप यांना नाटय़मय घडामोडीनंतर उमेदवारी जाहीर झाली. एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी लावलेली प्रतिष्ठा व मागील वेळी दिलेला शब्द पाळण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका पथ्यावर पडल्याने जगतापांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.
स्थायी अध्यक्षपदाची निवडणूक एक एप्रिलला असून गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता. अध्यक्षपदासाठी जगताप व महेश लांडगे, सुनीता वाघेरे, अविनाश टेकवडे, चंद्रकांत वाळके या पाच जणांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, अजितदादांनी जगताप यांना संधी देऊन चिंचवड मतदारसंघाला प्रतिनिधित्व दिले आहे. अर्ज भरण्याच्या निर्धारित मुदतीत जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित असून एक तारखेला त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. आमदार जगताप, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, महापौर मोहिनी लांडे, पक्षनेत्या मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी विशेषत: चिंचवड मतदारसंघाचे नगरसेवक बहुसंख्येने होते.
सकाळपासून शहरातील राजकीय वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण होते. अजितदादांनी साडेतीनच्या सुमारास दूरध्वनी करून जगताप यांना उमेदवारी दिल्याचे मंगला कदम यांना कळवले. त्यानुसार एकच अर्ज दाखल करण्यात आला. यासंदर्भात, नगरसचिव दिलीप चाकणकर यांनी सांगितले,की जगताप यांचे एकटय़ाचेच दोन अर्ज आहेत. पहिल्या अर्जावर जगदीश शेट्टी व माया बारणे सूचक-अनुमोदक आहेत. तर, दुसऱ्या अर्जावर शकुंतला धराडे व सुषमा तनपुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
व्यवस्थित काम करा- अजित पवार
उमेदवारी निश्चित केल्याचे पक्षनेत्यांना सांगितल्यानंतर अजितदादांनी नवनाथ जगताप यांनाही दूरध्वनी केला. व्यवस्थित आणि सर्वाना बरोबर घेऊन काम करा, कोणत्याही तक्रारी येता कामा नयेत, असे अजितदादांनी जगतापांना बजावून सांगितले.