पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजाचे प्रमुख असलेल्या प्र- कुलगुरूपदाची निवड रखडली आहे. कुलगुरूंची निवड होऊन अडीच महिने उलटल्यानंतरही विद्यापीठाला प्र- कुलगुरू मिळालेले नाहीत. त्यामुळे प्र- कुलगुरूंची निवड कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा >>> मेट्रो सुसाट! स्वातंत्र्यदिनी प्रवासी संख्येचा उच्चांक
डॉ. सुरेश गोसावी यांची ७ जूनला कुलगुरूपदी निवड झाली. विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांनुसार आता कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेला प्र- कुलगुरूंच्या निवडीचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार डॉ. गोसावी यांनी प्र- कुलगुरूंचे नामनिर्देशन करणे आणि व्यवस्थापन परिषदेने त्यावर शिक्कामोर्तब करणे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रक्रियेत प्र- कुलगुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण प्र- कुलगुरू शैक्षणिक कामकाजाचे प्रमुख असतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली असताना विद्यापीठाचे प्र- कुलगुरूपद रिक्त असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावरही होत आहे.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: हरवलेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी दिले परत!
काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्र- कुलगुरूंच्या निवडीबाबत चर्चा झाली. मात्र, निवड होऊ शकली नाही. प्र- कुलगुरूंच्या निवडीसाठी आणखी काही काळ देण्यात आला आहे. त्यामुळे प्र- कुलगुरूंची निवड कधी होणार, असा प्रश्न आहे.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर लगेचच प्र- कुलगुरूंची निवड करण्यात आली. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र- कुलगुरूंची निवड अजूनही झालेली नाही. प्र- कुलगुरू पद रिक्त राहिल्यास त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होतो. प्र- कुलगुरूंची निवड रखडण्यामागे व्यवस्थापन परिषदेतील हेवेदावे, राजकीय किंवा अन्य काही दबाव आहेत का, असा प्रश्न पडला आहे. – धनंजय कुलकर्णी, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य