पुणे : शहरात एखाद्या रोगाची साथ सुरू होण्याआधीच त्याची माहिती तातडीने मिळणे शक्य होणार आहे. पुणे महापालिकेकडून नागरी साथरोग सर्वेक्षण केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून साथरोगांचा धोका वेळीच रोखता येणार आहे. हे केंद्र बाणेर येथे उभारण्यात येत असून, ते एप्रिल महिन्यात कार्यान्वित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारकडून राज्यातील चार शहरांची सर्वेक्षण केंद्र उभारण्यासाठी निवड झाली आहे. त्यात पुण्यासह, ठाणे, मुंबई आणि नागपूरचा समावेश आहे. महापालिकेकडून बाणेर येथे सहा हजार चौरस फूट जागेवर हे केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. याबाबत पुणे महापालिका आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) यांच्यात परस्पर सामंजस्य करार झाला आहे. या केंद्राच्या ठिकाणी एनसीडीसीच्या सहसंचालिका मीरा धुरिया यांच्यासह राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा >>>२८ वर्षांची सेवा, ३५१ बक्षीस, अन् २३ प्रशस्तीपत्रक; पिंपरीतील ‘या’ पोलीस अधिकाऱ्याला जाहीर झाले राष्ट्रपती पदक

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम केंद्र सरकारकडून राबविला जात आहे. या अंतर्गत देशातील नागरी भागात साथरोगांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात साथरोगांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करून तिथे माहिती तंत्रज्ञानाधारित सर्वेक्षण यंत्रणा सुरू करण्यात येते. त्यामुळे शहरात सुरू असलेले आजार शोधणे, एखादी साथ सुरू होण्याआधी सुरूवातीच्या टप्प्यात तिला प्रतिबंध करणे, एखाद्या आजार आढळून आल्यास तातडीने धोक्याचा इशारा देणे, या बाबी या माध्यमातून शक्य होणार आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणखी सक्षम होण्यास मदत होणार आहे.

शहरात एखाद्या रोगाची साथ सुरू झाल्यास त्याची तातडीने माहिती मिळावी आणि उपाययोजना करता याव्यात, हा सर्वेक्षण केंद्र स्थापन करण्याचा हेतू आहे. भविष्यात साथरोगांचा धोका कमी करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिलला असतो. त्यावेळी हे केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.- डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका