पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्रपरवाना विभागातील लिपिकाने बनावट नोंदींच्या आधारे दिलेल्या शस्त्रपरवान्यावर अग्निशस्त्र विकत देणाऱ्या विक्रेत्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. साधू वासवानी चौकातील ‘सफारी आर्म अॅड अॅम्युनेशन’ या दुकानाचा मालक व कामगाराचा त्यात समावेश आहे. या दुकानातील कामगाराने लिपिकाकडून बनावट शस्त्रपरवाना घेऊन एक पिस्तूल खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.
सैफुद्दीन सुजाउद्दीन नुराणी (वय ५२, रा. ब्रम्हा होरीजॉन, लुल्लानगर) आणि चंद्रकांत नारायण पारपल्ली (वय ३३, रा. शितळादेवी चौक, गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात पूर्वी आयुक्तालयातील लिपीक कैलास सदाशिव भोसले (वय ४३, रा. चिंचवडगाव), अजय रमेश अगरवाल (वय ४६), राजेंद्र शिर्के (वय ४४) आणि प्रवीण ऊर्फ पवन सुरेश काठमोडे (वय २०) यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या जामिनावर आहेत. आरोपी नुराणी हा दुकानाचा मालक आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले याने पोलीस आयुक्तालयातील शस्त्रपरवाना रजिस्टरमध्ये बनावट नोंद करून शस्त्रपरवाना दिल्याचे उघड झाले होते. त्यानंतर तपास करून त्याच्यासह इतर आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असताना भोसले हा नुराणीच्या दुकानात जात असल्याची माहिती पुढे आली. त्याच बरोबर या दुकानात कामगार असलेला पारपल्ली याने भोसलेशी संगनमत करून स्वत:च्या नावाने बनावट शस्त्रपरवाना तयार करून घेतला. त्या परवान्यावर याच दुकानातून बंदूक खरेदी केली. त्याचबरोबर इतर दोन व्यक्तींकडून पैसे घेऊन भोसले याने त्यांना बनावट शस्त्रपरवाने दिले. नुराणी याने त्या परवान्यावर त्या दोन व्यक्तींना आपल्या दुकानातून शस्त्रास्त्राची विक्री केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले.  ‘‘भोसले हा या दुकानात जात होता. त्यामुळे भोसले व नुराणी यांनी संगनमत करून कितीजणांना बनावट परवाना दिले आहेत. त्याच बरोबर दुकानात विक्रीसाठी आणलेले आर्म अॅन्ड अॅम्युनेशन बाबत पडताळणी करायची आहे. त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे,’’ असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी करून पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य़ धरत दोघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.