पुणे : नामांकित घड्याळ उत्पादक कंपनीच्या नावे बनावट घड्याळांची विक्री करणाऱ्या शुक्रवार पेठेतील एका दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत १७५ बनावट घड्याळे जप्त केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात कॉपीराईट कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत देवजीबाई प्रजापती (रा. शनिवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शुक्रवार पेठेतील शहाबीया सोसायटीतील चामुंडे नॉव्हेल्टीज येथे ही कारवाई करण्यात आली. शुक्रवार पेठेतील एका दुकानात नामांकित कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर करून बनावट घड्याळांची विक्री केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी १७५ मनगटी घड्याळे जप्त केली. याप्रकरणी प्रजापती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाकाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे आणि पथकाने ही कारवाई केली.प्रजापतीविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नामांकित कपडे, पादत्राणे उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या नावे बनावट मालाची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने नुकताच उघडकीस आला होता. पोलिसांच्या पथकाने बनावट कपडे, पादत्राणांची विक्री करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल करुन लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.