बाळासाहेब जवळकर
दुष्काळामुळे जनावरांचा सांभाळ शेतकऱ्यांना अवघड
दुष्काळी स्थिती, पाण्याचे दुर्भिक्ष आणि चाराटंचाईमुळे जनावरांना पाळणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे जनावरे विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून, चाकणच्या बाजारात विक्रीसाठी आणलेल्या जनावरांची संख्या वाढली आहे. त्यात बैलगाडी शर्यतीच्या बैलांचाही समावेश असून, दीड ते दोन लाखांना खरेदी केलेल्या बैलांना जेमतेम ४० हजारांपर्यंत आणि शेतीतल्या बैलांना २० ते ३० हजार भाव मिळत आहे.
चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात दर शनिवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात पुणे जिल्ह्य़ातील खेड, आंबेगाव, मावळ, शिरूर, मुळशी, हवेलीसह राज्याच्या विविध भागांतील शेतकरी सहभागी होतात. बैल, म्हैस, गायी, जर्सी गायी, शेळी-मेंढी आदींची खरेदी-विक्री होणाऱ्या या बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. यंदा शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा फटका बसला आहे. जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळत नाही. चारा छावण्यांची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. त्यामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचा जनावरे विकण्याकडे कल दिसून येत आहे.
विक्रीसाठी मोठय़ा संख्येने जनावरे येत असली, तरी त्यांना अपेक्षित खरेदीदार मात्र मिळत नाही. यापूर्वी बाजारात पाय ठेवायला जागा नसायची. आता ही गर्दी निम्म्याने कमी झाल्याचे सांगण्यात येते. विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांमध्ये शर्यतीचे बैल वाढले आहेत. अशा प्रकारचे बैल खरेदी करताना दीड ते दोन लाखांपासून तीन ते साडेतीन लाख रुपये मोजावे लागत होते. तेच बैल २५ हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. शर्यतीच्या बैलांची शेतकऱ्यांकडून अधिक काळजी घेतली जाते. ज्यांना मुलांप्रमाणे सांभाळले, त्यांना विकण्याची वेळ आल्याचे ते सांगतात.
खरेदी करताना जे भाव दिले गेले, त्या तुलनेत मातीमोल किमतीत त्यांची विक्री करावी लागल्याची भावना शेतकरी व्यक्त करतात.
विक्री निम्म्यांनी घटली
गेल्या शनिवारी चाकण बाजारात विक्रीसाठी आलेल्या ३५ जर्सी गायींपैकी जेमतेम १५ गायी विकल्या गेल्या. त्यांना १५ हजारांपासून पुढे भाव मिळाला. ३५० बैल विक्रीसाठी आले, त्यापैकी १५० बैलांची विक्री होऊ शकली. त्यांना प्रत्येकी १० हजारांपासून पुढे भाव मिळाला. ४५ म्हशींपैकी २२ म्हशी विकल्या गेल्या. त्यांना २० हजारपासून पुढे भाव मिळाला.
यंदा चारा आणि पाणीटंचाई अधिकच जाणवू लागली आहे. त्यामुळे या महिन्यात जनावरे विक्रीसाठी येऊ लागली आहेत. मात्र खरेदीसाठी कोणी पुढे येत नाही. विक्रीसाठी बैल घेऊन येणाऱ्यांमध्ये सामान्य शेतकऱ्यांबरोबरच बैलगाडा मालकही दिसू लागले आहेत. खिल्लारी बैलांचे पोषण करणे त्यांना अवघड जाते. त्यामुळे जनावरे सांभाळण्याऐवजी विकून चार पैसे कमावण्याचा शेतकऱ्यांचा हेतू दिसून येतो.
– सतीश चांभारे, सचिव, खेड बाजार समिती