एकाच दिवसात शहरातील १७३ विक्रेत्यांवर कारवाई
शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध शाळांच्या बाहेर गुटखा, सुपारी मिक्स, सिगारेट अशा पदार्थाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस पोलिसांकडून महापालिकेकडे करण्यात येणार आहे.
शाळा-महाविद्यालयांबाहेर सिगारेट, गुटखा, सुपारी मिक्सची विक्री होत असल्याचे वृत्त गेल्या आठवडय़ात ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तात पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांबाहेर असलेल्या पानपट्टय़ा, किरकोळ विक्रेत्यांकडून सुरू असलेली तंबाखूजन्य पदार्थाची विक्री या बाबतची माहिती देण्यात आली होती. पोलिसांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला होता. शाळांबाहेर सुरू असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई तीव्र करण्यात आली. सोमवारी दिवसभरात वेगवेगळय़ा भागांतील १७३ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर पानपट्टीचालक तसेच किरकोळ विक्रेत्यांकडून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी खडक, फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, शिवाजीनगर, डेक्कन, लष्कर, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, स्वारगेट, सहकारनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड, चतु:शृंगी, खडकी, कोथरूड, वारजे, हडपसर, कोंढवा, वानवडी, येरवडा, चंदननगर, विश्रांतवाडी, विमानतळ भागात कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी गुन्हे शाखेतील पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली होती. सोमवारी दिवसभरात १७३ जणांवर कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी संपूर्ण वर्षभरात ३१५ जणांवर कारवाई करण्यात आली होती, असे देशपांडे यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांच्या बाहेर गुटखा, सिगारेट, सुपारी मिक्स अशा पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई केली होती. कारवाईनंतरही पुन्हा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची शिफारस महापालिकेकडे करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त सरदेशपांडे यांनी स्पष्ट केले.
कायदा काय सांगतो
शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम-२००३ चे कलम ६ (ब) नुसार मनाई करण्यात आली आहे. एखादी व्यक्ती किंवा विक्रेता तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करताना आढळल्यास या कायद्याच्या कलम २४ नुसार शिक्षेस पात्र आहे.
शाळा-महाविद्यालयांबाहेर सिगारेट, गुटखा, सुपारी मिक्सची विक्री होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’तून २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.