सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांना लेखी पद्धतीने डिसेंबरअखेरीस सुरू होणार आहेत. परीक्षांच्या नियोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, येत्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
हेही वाचा- चिंचवड उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी
यंदा प्रथम वर्ष वगळता इतर वर्षांचे शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू झाले. त्यात प्रामुख्याने कला, वाणिज्य, विज्ञान शाखांतील पारंपरिक पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यानंतर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमचे वर्ग सुरू झाले. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात पारंपरिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत संपेल. साधारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा सुरू होतील. जानेवारी, फेब्रुवारीचे काही दिवस परीक्षा सुरू राहतील. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून संभाव्य परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.