शहराच्या विकास आराखडय़ात सत्ताधाऱ्यांनी आर्थिक हेतूने केलेले बदल नागरिकांना समजावून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरात चर्चासत्राद्वारे जागृती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात येत असून चर्चासत्राचा विषय ‘विकास आराखडय़ाचे श्रीखंड’ असा आहे.
मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. विकास आराखडय़ाची संपूर्ण माहिती नागरिकांना होणे आवश्यक असून आराखडय़ातील तरतुदी व बदलांवर नागरिकांना हरकती घेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा उपक्रम सुरू केला जात असल्याचे शेडगे यांनी सांगितले. ‘विकास आराखडय़ाचे श्रीखंड’ या विषयावरील चर्चासत्र १९ ते २२ एप्रिल दरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय होणार आहे. पर्वती व कसबा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी, हडपसर व कॅन्टोन्मेंटमध्ये २० एप्रिल रोजी, शिवाजीनगर व वडगावशेरी मतदारसंघामध्ये २१ एप्रिल रोजी आणि कोथरूड मतदारसंघात २२ एप्रिल रोजी चर्चासत्र होईल.
चित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना विकास आराखडा, आरक्षणे, तरतुदी, आरक्षणातील बदल यांची माहिती दिली जाणार आहे.
पक्षाचे सरचिटणीस अनिल शिदोरे, शहराध्यक्ष प्रकाश ढोरे, बाळा शेडगे तसेच नगरसेवकांची या वेळी माहितीपर भाषणे होतील. सायंकाळी सहा ते आठ अशी या चर्चासत्राची वेळ आहे.