परिवर्तनाच्या क्रांतीची ज्योत सर्वांपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची भूमिका प्रसारमाध्यमांची आहे. त्यांनी केवळ व्यावहारिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. उपेक्षितांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सर्वानी संघटित होऊन लढले पाहिजे, तरच माध्यमांकडून दखल घेतली जाईल, असा सूर पिंपरीतील एका परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
पिंपरी पालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘उपेक्षितांवर होणारे अत्याचार व माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, डॉ. बाबुराव गुरव, पार्थ पोळके, ‘लोकसत्ता’ चे मधू कांबळे, पत्रकार रणधीर कांबळे आदी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन डॉ. किशोर खिलारे यांनी केले.
डॉ. मनोहर म्हणाले, श्रध्देने समाज मरतो म्हणून समाजातील कार्यप्रवन व्यक्तींनी अन्याय, अत्याचाराविरूध्द उभे ठाकले पाहिजे. व्यापक चळवळी उभारल्यास माध्यमांना त्याची दखल घ्यावी लागेल. नेते एक होणार नसतील तर त्यांना उपेक्षितांवर बोलण्याचा अधिकार नाही. पोळके म्हणाले, समतावादी व विषमतावादी विचारांशी मैत्री होऊ शकत नाही, हे वास्तव असून उपेक्षितांच्या चळवळी सुरू करणाऱ्यांनी ही बाब लक्षात ठेवावी. राजकीय नेत्यांचे गुलाम न होता आपले प्रश्न थेट शासनापुढे मांडण्याचे धाडस केले पाहिजे. मधू कांबळे म्हणाले, माध्यमे पूर्णपणे उपेक्षितांच्या बाजूने नाही, हे खरे असले तरी सर्वच माध्यमे भांडवलदारांच्या बाजूने झुकलेली नाहीत. शस्त्र व शास्त्र यापासून वंचित ठेवल्याने उपेक्षित गुलाम ठरले आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचे समर्थन, संवर्धन होण्यासाठी चळवळी उभ्या केल्यास माध्यमे निश्चितपणे तुमच्या बाजूने उभी राहतील. रणधीर कांबळे म्हणाले, महत्त्वाचा विषय व व्यापक लोकसहभाग असलेल्या चळवळी माध्यमांना दखल घेण्यास भाग पाडतात. माध्यमांचा उपयोग सकारात्मक दृष्टीने व्हावा. गुरव म्हणाले, समाज परिवर्तनासाठी संघटना मजबूत करून कृतिशील चळवळी उभ्या केल्या पाहिजेत.