पुणे : रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर असणारी गर्दी, वाढती गुन्हेगारी, अमली आणि मादक पदार्थांची सर्रास विक्री, विकासाच्या नावाने शहराला आलेले बकालपण आणि त्यातून प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, वाचाळवीर राजकारण्यांमुळे प्रकरणांना मिळणारे वेगळे वळण यामुळे सांस्कृतिक आणि सुसंस्कृत पुण्याची ओळख दिवसेंदिवस बदलत चालली आहे. याला कारणीभूत पुण्याबाहेरून आलेली माणसे कारणीभूत असून, सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणाने पुन्हा बदल घडू शकतो, असा सूर ‘वेध अस्वस्थ मनाचा’ या परिसंवादात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडलेल्या विचारांतून उमटला.

‘वेध अस्वस्थ मनाचा – आवाज महाराष्ट्राचा, आवाज सर्वसामान्य माणसाचा’ या परिसंवादाचे आयोजन पराग ठाकूर, शिरीष मोहिते, उदय जगताप आणि समस्त पुणेकरांच्या वतीने टिळक रस्त्यावरील डॉ. नीतू मांडके सभागृह येथे करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ राजकीय नेते माधव भंडारी, माजी महापौर अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, व्याख्याते गणेश शिंदे आदी सहभागी होते.

राजकीय दबाव, अनास्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यावरून काकडे म्हणाले, ‘प्रत्येक राजकीय पक्षात वाचाळवीर वाढले आहेत. याला कारण पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्यावर असलेला वचक संपला आहे. त्यातूनच गुन्हेगारी, राजकीय अनास्था, विकासाला खिळ बसत आहे. पुणे शहराचा झपाट्याने विकास झाला, परंतु, सांस्कृतिक पुण्याची ओळख संपली. आपली दुरवस्था झाली असून, याला आपण सगळेच कारणीभूत आहोत. सर्वच क्षेत्रांतील वाईट परिस्थिती बदलण्याकरिता पुणेकरांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.’

भंडारी म्हणाले, ‘पक्षाचा नेता असो किंवा कार्यकर्ता त्यांनी भान सोडून बोलू नये. सकाळ संध्याकाळ एकच बोलत असल्याने हा सुसंस्कृतपणा नसून, हेतूपुरस्सर बोलण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. पुण्यासाठी गंभीर मुद्दा हा मादक द्रव्यांचा विळखा आहे. शाळकरी मुले यात आहेत. या विरोधात लढा देण्याची गरज आहे. त्याकरिता खासगी शैक्षणिक संस्थाच्या व स्वायत्त विद्यापीठ यांच्या प्रमुखांना एकत्र आणणे आवश्यक असून, त्यातूनच मार्ग निघेल.’

पुण्याची संस्कृती बिघडवायला बाहेरची माणसे आली आहेत. त्यातून उद्भविणाऱ्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, सज्जनशक्ती निष्क्रिय होत असून दुर्जन शक्ती वाढत असल्याचे पाठक यांनी स्पष्ट करून पोलिसांचा धाक राहिला नसल्याची खंत व्यक्त केली.गिल म्हणाले, ‘लहान मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. शालेय मुलांच्या दप्तरात कोयते व धारदार शस्त्रे सापडतात. याची तपासणी पालक व शिक्षकांनी करायला हवी. त्यामुळे पालकांनी मुलांचे चांगले मित्र होणे अपेक्षित आहे.’

Story img Loader