भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची महापालिकेतील युती संपुष्टात आल्याची घोषणा गुरुवारी भाजपकडून करण्यात आली. महापालिका निवडणुकीला अद्याप अकरा महिने बाकी असले तरी तोपर्यंतही या पक्षांची युती राहणार नाही हे गुरुवारी स्पष्ट झाले. महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती असतानाही महापालिकेत होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत शिवसेनेचे नेते सहकार्य करत नाहीत, तसेच विश्वासातही घेत नाहीत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळेच महापालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला छुप्या पद्धतीने मदत करत आहे, असा आरोप भाजपचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे त्यांच्याबरोबर असलेली किमान महापालिकेतील आमची युती तुटली आहे, असेही बीडकर यांनी या वेळी जाहीर केले.
महापालिकेच्या शहर सुधारणा, क्रीडा, महिला व बालकल्याण आणि विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी (४ एप्रिल) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज दाखल करायचे होते. या समित्यांमध्ये भाजपाचे प्रत्येकी दोन तर शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य आहे. बलाबल कमी असल्याने या निवडणुका युती करुन लढवाव्यात, असा प्रस्ताव भाजपाच्या
नेत्यांनी दिला होता. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने भाजपला अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करता आले नाहीत. या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली.
त्याबाबत प्रतिक्रिया देताना बीडकर म्हणाले की, चार विषय समित्यांपकी भाजपाने दोन आणि शिवसेनेने दोन निवडणुका लढवाव्यात, असा प्रस्ताव शिवसेनेला देण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश बापट यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांच्याशी याबाबत चर्चाही केली होती. मात्र शेवटच्या क्षणी शिवसेनेकडून या प्रस्तावाला प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळेच या निवडणुका बिनविरोध झाल्या असून त्याला शिवसेनेची भूमिकाच जबाबदार आहे. त्यामुळे महापालिकेतील आमची युती संपली आहे.
महापालिकेतील भाजपचा कारभार स्वत:च्या सोयीसाठी सुरू असून काही विषयांमध्ये भाजपने राष्ट्रवादीला साथ दिली आहे. त्यामुळे भाजपने आम्हाला युतीधर्म सांगू नये. आमची बांधीलकी जनतेशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी व्यक्त केली.

Story img Loader