तुमची तिन्ही पक्षाच्या नगरसेवकांची मिळून होणारी एकोणसत्तर ही संख्या काही कमी नाही. त्यामुळे जेमतेम बहुमत असलेल्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही तिघांनी एकत्र येऊन दणका द्या, असा सल्ला शिवसेनेचे शहर संपर्क नेते गजानन कीर्तिकर यांनी गुरुवारी शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना महापालिकेत येऊन दिला.
शहर व जिल्हा संपर्क नेतेपदी निवड झाल्यानंतर कीर्तिकर यांनी गुरुवारी प्रथमच महापालिकेत येऊन शिवनसेनेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील शिवसेना नगरसेवकांची उपस्थिती, शहराच्या प्रश्नांबाबतचे आंदोलनात्मक कार्यक्रम याबाबत या वेळी चर्चा झाली. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी असली, तरी नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काय काय करता येईल याबाबतही या वेळी नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या.
शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीनंतर कीर्तिकर यांनी भाजपचे गटनेता अशोक येनपुरे आणि मनसेचे गटनेता वसंत मोरे यांची भेट घेतली. शिवसेना, भाजप आणि मनसे हे विरोधी पक्ष असले, तरी तुमची तिन्ही पक्षाच्या सदस्यांची मिळून ६९ संख्या आहे. ही चांगली संख्या आहे. सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असले आणि काही विषयांमध्ये त्यांच्याकडून मनमानी होत असली, तरीही तुम्ही तिघे मिळून महापालिकेत चांगली भूमिका पार पाडू शकता. त्या दृष्टीने एकत्र येऊन पुणेकरांच्या प्रश्नांवर आवाज उठवा, अशी भूमिका कीर्तिकर यांनी या वेळी मांडली. या चर्चेत येनपुरे आणि मोरे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन एकत्र येऊन काम करण्याबाबत तयारी दर्शवल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले.
‘भानगिरे यांनी राजीनामा द्यावा’
हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची असल्यामुळे शिवसेना नगरसेवक नाना भानगिरे मनसेमध्ये गेले आहेत. त्यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करायची याचा निर्णय आम्ही घेऊ. त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा म्हणजे पोटनिवडणूक होईल. मग त्या निवडणुकीत त्यांना दणका देऊ, असेही गजानन कीर्तिकर म्हणाले. विधानसभेच्या उमेदवारीचे गणित तयार करून अनेक जण आता मनसेत जात आहेत. त्यामुळे मनसेची विधानसभा उमेदवारांची यादीच तयार व्हायला लागली आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader