पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी आपला वाङ्मयीन कार्यासाठीचा एक लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना वाङ्मयीन कार्यासाठी एक लाख रुपयांचा निधी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात देण्यात येतो. नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते संमेलनास उपस्थित राहू शकले नव्हते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्याशी या निधीसंदर्भात संपर्क साधला. त्या वेळी हा निधी न स्वीकारता महाराष्ट्र साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतल्याचे मंगला नारळीकर यांनी सांगितले.

प्रा. जोशी म्हणाले, २०१० मध्ये पुण्यात डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ८३ व्या साहित्य संमेलनानंतर आयोजक संस्था असलेल्या पुण्यभूषण फाऊंडेशनने ८२ लक्ष रुपयांची देणगी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिली. त्या देणगीच्या व्याजातून अन्य साहित्यिक उपक्रमांबरोबर प्रतिवर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लाख रुपयांचा निधी दिला जातो. अध्यक्षांच्या प्रवास, निवासाची व्यवस्था करण्यात निधीअभावी अडचणी येऊ नये या उद्देशातून संमेलनाध्यक्षांना हा निधी दिला जातो. 

Story img Loader