पुणे : आयुर्वेद आणि रुग्णसेवेचा तीन पिढ्यांचा वारसा लाभलेल्या डॉ. सुहास परचुरे यांचे अल्पशा आजाराने (७६ वर्षे) निधन झाले. आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि आयुर्वेदाचे शिक्षण अशा स्वरुपात त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. परचुरे यांचे पार्थिव बुधवारी सकाळी सात वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार असून साडेनऊ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. सुहास परचुरे हे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पदव्युत्तर संचालक होते. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते. पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. आयुर्वेद रसशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बुद्ध्यांक वाढवण्यासाठी राबवलेल्या शंखपुष्पी या टॉनिकच्या संशोधनातील प्रमुख संशोधक म्हणूनही त्यांचे योगदान आहे. ‘इंटिग्रेटेड मेडिसिन’ या विषयाबाबत त्यांना विशेष तळमळ होती. आयुर्वेदिक डॉक्टरांना ॲलोपॅथी औषध वापराची परवानगी मिळावी याबाबत त्यांनी केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा केला होता.
आयुर्वेद आणि रुग्णसेवेतील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वैद्य खडीवाले संस्था पुरस्कृत महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार तसेच राष्ट्रीय शिक्षण मंडळाचा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विविध शाखांच्या महाविद्यालयांच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले असून आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व आणि जगन्मित्र असा डॉ. परचुरे यांचा लौकिक आहे. डॉ. परचुरे यांचे ‘औषधे स्वयंपाकघरातील’ हे पुस्तक विशेष लोकप्रिय ठरले.