पुणे : मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक पर्वती भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर २७ ऑगस्ट रोजी संपर्क साधला. धीरज कुमार असे नाव सांगणाऱ्या चोरट्याने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली होती. तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे. याप्रकरणात मुलासह नातेवाईकांचे नाव गुन्ह्यात टाकण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी बतावणी चोरट्याने त्यांच्याकडे केली होती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यावर दोन लाख ४९ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
गुंतवणुकीच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करण्याचे सत्र कायम आहे. सायबर चोरट्यांनी दोन तरुणांची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक केली. याप्रकरणी चतु:शृंगी आणि चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. गोखलेनगर भागातील एका तरुणाला गुंतवणुकीचे आमिष दाखवून चोरट्यांनी १६ लाख रुपयांची फसवणूक केली, तसेच वडगाव शेरी भागातील एकाची गुंतवणुकीच्या आमिषाने सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.